बंगळुरू - ऑनलाइन ट्रकिंग प्लॅटफॉर्म ब्लॅकबक आता त्यांचं बंगळुरू येथील कार्यालय बंद करण्याच्या तयारीत आहे. याबाबत कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ राजेश याबाजी यांनी सोशल मिडिया प्लॅटफोर्मवर माहिती दिली. कंपनीने वाहतूक आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या समस्यांचे कारण देत बेंगळुरूच्या आउटर रिंग रोड (ORR) वरील बेलांदूर येथील आपले ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले.
बंगळुरू शहर आयटी कॉरिडोरमधील एक आहे. याठिकाणी कायम वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो. हाच मुद्दा उपस्थित करत राजेश याबाजी यांनी म्हटलं की, बंगळुरूच्या बेलंदूर येथे मागील ९ वर्षापासून आमचे कार्यालय आणि घर होते. परंतु आता याठिकाणी काम करणे कठीण झालं आहे. ज्यामुळे आम्ही हे ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सरासरी दीड तासाहून अधिक झाला आहे. या ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याशिवाय धूळही मोठ्या प्रमाणात असते. वर्षोनुवर्षे अशी अवस्था असूनही तिथे बदल करण्याची कुणाची इच्छा दिसत नाही. पुढील ५ वर्षातही काही बदल होतील असं दिसत नाही असं त्यांनी म्हटलं.
सरकारला दखल घ्यायला हवी
ब्लॅकबकने खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे त्यांचं ऑफिस बेलंदूरहून हलवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही एकमेव कंपनी नाही. याआधीही अनेक कंपन्यांनी इथून काढता पाय घेतला आहे. अलीकडेच ग्रेटर बंगळुरू आयटी कंपनी अँन्ड इंडस्ट्री असोसिएशनने पायाभूत सुविधांवर चिंता व्यक्त केली. संथगतीने चालणारी वाहतूक, खड्ड्यांमुळे होणारी कोंडी आणि त्यासाठी लागणारा वेळ यावर त्यांनी भाष्य केले. शहरातील या समस्यांमुळे प्रमुख कंपन्या इथून पलायन करत आहेत. रस्ते, मेट्रो कनेक्टिविटी सुधारण्यासाठी आवश्यक रोडमॅप हवा असं असोसिएशनचे महासचिव कृष्ण कुमार गौडा यांनी मागणी केली.
ब्लॅकबक कंपनीचा व्यवसाय काय?
बंगळुरू येथील ब्लॅकबक कंपनी एक दिग्गज लॉजिस्टिक्स कंपनी आहे. जी ट्रकिंग सेक्टरमध्ये काम करते. ही कंपनी शिपर्स आणि ट्रक ड्रायव्हर यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सेवा देते. ट्रकचे बुकिंग, ट्रॅकिंग, पेमेंटसारख्या सुविधा पुरवल्या जातात. कंपनीकडे २,५०,००० हून अधिक रजिस्टर्ड ट्रकचे मजबूत नेटवर्क आहे. भारतात २ हजाराहून अधिक ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे.