नवी दिल्ली - अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चीनवर अमेरिकेचे प्रचंड शुल्क आणि चीनच्या कारवाईमुळे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि संगणक बनवणाऱ्या जागतिक कंपन्या त्यांच्या उत्पादनातील सर्व किंवा काही भाग भारतात हलवण्याचा विचार करत आहेत. मात्र त्यासाठी सरकारी पातळीवर जोर लावण्याची गरज आहे.
काउंटर पॉइंट रिसर्चनुसार, २०२४ मध्ये स्मार्टफोन उत्पादनात चीनचा जागतिक वाटा ६४ टक्के होता, तो २०२६ पर्यंत ५५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. टॅरिफच्या या खेळात भारत एक मोठा लाभार्थी बनू शकतो आणि २०२६ पर्यंत जागतिक स्मार्टफोन उत्पादनात भारताचा वाटा १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
तैवान खेळ खराब करेल
लॅपटॉप निर्माता कंपन्या चीनला पर्याय म्हणून तैवानकडे पाहत आहेत. अशा स्थितीत तैवान भारताचा खेळ खराब करू शकतो. व्हिएतनाममध्ये अनेक कंपन्या जाण्याच्या तयारीत आहेत.
...तर मिळेल दुप्पट फायदा
जागतिक लॅपटॉप उत्पादनात भारताचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र जर प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाचा काही भाग चीनमधून भारतात हलवला, तर भारत लॅपटॉपमध्येही मोबाइल क्षेत्रातील यशोगाथेची पुनरावृत्ती करू शकतो.