Join us

दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:15 IST

Kotak Mahindra Bank : बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेनं सादर केलेल्या नव्या ब्रॅकेटमध्ये ही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

Kotak Mahindra Bank : खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनं बचत खातं असलेल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेनं पाच लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेनं सादर केलेल्या नव्या ब्रॅकेटमध्ये ही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

कोटक महिंद्रा बँकेनं एक नवीन ब्रॅकेट सादर केलं आहे. या अंतर्गत पाच लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांवरील व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली. व्याजदर ३.५ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी बँकेच्या बचत खात्याचे दोनच स्लॅब होते. पहिल्या स्लॅबमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ३.५ टक्के आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर ४ टक्के व्याज दर होता.

मात्र, आता बँकेने तीन स्लॅब तयार केले आहेत. त्यातील एक स्लॅब पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचा आहे. त्याचा व्याजदर वार्षिक ३ टक्के आहे. तर ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ३.५ टक्के व्याज दर आहे. त्यानंतर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ४ टक्के व्याज दर मिळतो.

एफडीच्या व्याजदरात बदल नाही

कोटक महिंद्रा बँकेनं एफडीच्या व्याजदरात बदल केलेला नाही. बँक सामान्य नागरिकांसाठी २.७५ टक्के ते ७.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.२५ ते ७.९० टक्के व्याज देत आहे. हे दर १४ जून २०२४ पासून लागू आहेत.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेनं स्टँडर्ड चार्टर्ड बँक इंडियाचं पर्सनल लोन बुक विकत घेण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे ४,१०० कोटी रुपयांच्या (सुमारे ४९० मिलियन डॉलर्स) थकित कर्जाचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कर्जे स्टँडर्ड लोनच्या श्रेणीत येतात. प्रस्तावित व्यवहार ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

टॅग्स :बँकपैसा