अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून दुसऱ्यावेळचा राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभरा स्वीकारला आहे, तेव्हापासून ते जगाला त्रासच देत सुटले आहेत. ट्रम्प यांना सर्वाधिक भारत आणि चीन खुपतो आहे. त्यांनी अमेरिकेला देखील छळण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर भारत, चीन सारख्या देशांना टेरिफ वॉरवरून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी युक्रेनचा देखील नंबर लागलेला आहे. अशातच आता रशियाकडून स्वस्त दराने कच्चे तेल भारत घेत आहे, ते देखील ट्रम्प यांच्या डोळ्यांत खुपू लागले आहे.
रशियाकडून जर भारताने कच्चे तेल घेणे बंद केले नाही तर अमेरिका १०० टक्के टेरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जर भारताने ही धमकी गांभिर्याने घेतली व रशियाकडून तेल आयात करणे थांबविले किंवा सर्व जगानेच रशियाकडून तेल आयात थांबविली तर पेट्रोल, डिझेलचे दर ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला अद्याप दोन महिन्यांचा वेळ असला तरी देखील ही शक्यता नाकारता येत नाही. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील याबाबत भीती व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनवरील युद्ध ५० दिवसांत थांबविण्यास सांगितले आहे. गेल्या काही काळापासून ट्रम्प हे भारत-पाकिस्तानसह वेगवेगळ्या देशांतील युद्धे थांबविल्याचा दावा करत आले आहेत. भारताबाबत दावा करताना तर ते थकतच नाहीएत. अशा परिस्थितीत आता त्यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबवायचे आहे. रशियाने तसे केले नाही तर जे देश रशियासोबत व्यापार करतात त्यांच्यावरही १०० टक्के टॅरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. म्हणजेच भारत, चीन आणि ब्राझील सारख्या देशांना ही धमकी देण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून ट्रम्प यांना भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल घेत असल्याचे खुपत आहे.
रशियाकडून २०२२ पर्यंत भारत केवळ २ टक्केच कच्चे तेल घेत होता, परंतू रशियावर निर्बंध आले आणि रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास सुरुवात केली. आता रशिया जेवढे कच्चे तेल निर्यात करतो त्यापैकी ३८ टक्के तेल हे भारत खरेदी करतो एवढे प्रमाण वाढले आहे. जगाला ९७ दशलक्ष बॅरल कच्चे तेल लागते, त्याच्या जवळपास १० टक्के वाटा हा रशियाचा आहे. जर रशियाकडून कच्चे तेल बाजारात आले नाही तर या देशांना ९० टक्के तेलातूनच खरेदी करावी लागणार आहे. म्हणजेच कच्च्या तेलाचे दर वाढणार आहेत, अशी शक्यता केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी एक कार्यक्रमात व्यक्त केली आहे. असे झाले तर कच्च्या तेल्याचा किंमती १३०-१४० डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच भारतात या किंमतींवेळी डिझेल १०६-१०८ आणि पेट्रोल ११४-११६ रुपये लीटर होते, तेच दर पुन्हा गाठण्याची शक्यता आहे.