Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँका, वित्त कंपन्यांमुळे शेअर बाजारामध्ये तेजी; जागतिक बाजारांमध्ये झाली घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 07:59 IST

राष्ट्रीय शेअर बाजारातही सकाळपासूनच तेजीचे वातावरण दिसून आले. येथील निर्देशांक (निफ्टी) ७८.३५ अंश म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी वाढून १४,८१४.७५ अंशांवर बंद झाला.

मुंबई : मोरेटोरियमला आणखी वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये तेजी परतली आहे. बाजाराचे प्रमुख निर्देशांक वाढलेले दिसून आले. सेन्सेक्सने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई शेअर बाजारात सकाळीच तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २०० हून अधिक अंशांनी वाढून खुला झाला. त्यानंतर त्यात वाढ होताना दिसून आली. बाजार बंद होताना हा निर्देशांक २८०.१५ अंशांनी वाढून ५०,०५१.४४ अंशांवर बंद झाला. 

राष्ट्रीय शेअर बाजारातही सकाळपासूनच तेजीचे वातावरण दिसून आले. येथील निर्देशांक (निफ्टी) ७८.३५ अंश म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी वाढून १४,८१४.७५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही अनुक्रमे १९१.८१ व १५३.७६ अंशांनी वाढून बंद झाले आहेत. जागतिक बाजारांमध्ये संमिश्र वातावरण असतानाही सर्वोच्च् न्यायालयाच्या निर्णयानंतर बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे बाजार तेजीमध्ये आला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अमेरिकन अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करऱ्याची घोषणा केली. मात्र त्यापाठोपाठच अमेरिका आणि युरोपने चीनच्या अधिकाऱ्यावर निर्बंध आणण्याची घोषणा केल्याने जागतिक शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्याचे मंगळवारी बघावयास मिळाले. लंडन आणि फ्रँकफर्ट येथील बाजार खाली येऊन सुरू जाले तर शांघाय, टोकियो आणि हाँगकँग येथील बाजार बंद होताना खाली आले आहेत.

टॅग्स :शेअर बाजार