Join us

Bajaj Housing Finance चा IPO येणार; ७००० कोटी उभारण्याचा प्लॅन, SEBIकडे ड्राफ्ट पेपर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 13:26 IST

बजाज फायनान्सची उपकंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सनं आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केले आहेत.

बजाज फायनान्सची (Bajaj Finance) उपकंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सनं (Bajaj Housing Finance) आयपीओसाठी (IPO) बाजार नियामक सेबीकडे (SEBI) ड्राफ्ट पेपर सादर केले आहेत. कंपनीला पब्लिक इश्यूमधून ७,००० कोटी रुपये उभे करायचेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा सेबीकडे ई-फायल करण्यात आल्याची माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी मनीकंट्रोलला दिली. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या संचालक मंडळाने ६ जून रोजी कंपनीच्या लिस्टिंग प्लॅनला मंजुरी दिली. 

यामध्ये बाजारातील परिस्थितीच्या अधीन राहून आयपीओ अंतर्गत ४,००० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करणं आणि इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश होता. बजाज फायनान्सनं ७ जून रोजी ओएफएसची किंमत ३,००० कोटी रुपये असेल, असे जाहीर केले होते. 

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओमागे (IPO) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) नियमही असू शकतो. आरबीआयनं बजाज हाऊसिंग फायनान्सला 'अप्पर लेयर एनबीएफसी'च्या (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीज) यादीत टाकले आहे. अप्पर लेयर कॅटेगरीमध्ये समाविष्ट असलेल्या एनबीएफसींना हा दर्जा मिळाल्यानंतर ३ वर्षांच्या आत शेअर बाजारात लिस्ट व्हावं लागतं. 

केव्हापर्यंत होणार लिस्ट? 

बजाज हाऊसिंग फायनान्सकडे लिस्ट करण्यासाठी सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सव्यतिरिक्त टाटा सन्स, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, आदित्य बिर्ला फायनान्स आणि सांघवी फायनान्स या एनबीएफसींचा समावेश आहे. 

कोण आहेत बँक अॅडव्हायझर? 

बजाज हाऊसिंग फायनान्सनं कोटक महिंद्रा कॅपिटल, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज, जेएम फायनान्शियल आणि एसबीआय कॅपिटल यांना आपल्या आयपीओसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. नुकतेच हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील २ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या आहेत. यामध्ये ब्लॅकस्टोनसमर्थित आधार हाऊसिंग फायनान्स आणि वेस्टब्रिजसमर्थित इंडिया शेल्टर फायनान्स यांचा समावेश आहे.

टॅग्स :व्यवसायबजाज ऑटोमोबाइलसेबीइनिशिअल पब्लिक ऑफरिंग