Join us  

बाबा रामदेव यांना ‘डिमॅट आसन’ महागात पडलं; करोडपती बनण्याची दिली होती गॅरंटी, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 11:48 AM

याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात बाबा रामदेव योगा कार्यक्रमात लोकांना डिमॅट अकाऊंट उघडून रुची सोया कंपनीचे शेअर्स खरेदी करा असा सल्ला दिला होता.

ठळक मुद्देबाजाराच्या नियमानुसार कुठल्याही प्रकारची गॅरंटी देणं हे नियमांच्याविरुद्ध आहेरुची सोया अथवा पंतजली आयुर्वेदमध्ये बाबा रामदेव यांची वैयक्तिक कुठलीही भागीदारी नाहीगुंतवणूकदारांना गॅरंटी देऊन शेअर्स खरेदी करण्यासाठी आमिष दाखवलं जाऊ शकत नाही

नवी दिल्ली  - पंतजली आयुर्वेदचे संस्थापक आणि योगगुरु बाबा रामदेव अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका योगा कार्यक्रमावेळी बाबा रामदेव यांनी लोकांना रुची सोयाचे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन कॅपिटल मार्केट रेग्युलेटर SEBI नाराज आहे. बाबा रामदेव यांनी लोकांना कोट्यधीश बनण्याची गॅरंटी दिली होती. त्यावरुन सेबी त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात बाबा रामदेव योगा कार्यक्रमात लोकांना डिमॅट अकाऊंट उघडून रुची सोया कंपनीचे शेअर्स खरेदी करा असा सल्ला देताना ऐकायला येत आहे. तुम्ही करोडपती बनाल याची गॅरंटी मी घेतो असं बाबा रामदेव(Yogguru Baba Ramdev) लोकांना सांगत आहेत. याबाबत आता SEBI नं कंपनीला पत्र लिहिलं आहे. या पत्रात सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बाजाराच्या नियमानुसार कुठल्याही प्रकारची गॅरंटी देणं हे नियमांच्याविरुद्ध आहे. यामुळे लोकांची फसवणूक होऊ शकते असं म्हटलं जातं.

सेबीनं रुची सोयाच्या फॉलो ऑन पब्लिक ऑफरला सांभाळणाऱ्या बँकर्स आणि इतर टीमला नोटीस पाठवून बाबा रामदेव यांच्याकडून झालेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. याबाबत बँकर्स आणि टीमनं सेबीच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेबीने हे पाऊल उचललं होतं. या व्हिडीओत बाबा रामदेव गुंतवणूकदारांना आमिष दाखवताना दिसले असल्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. पतंजली आयुर्वेदने दोन वर्षांपूर्वी दिवाळखोरी प्रक्रियेत रुची सोया विकत घेतली होती. रुची सोया अथवा पंतजली आयुर्वेदमध्ये बाबा रामदेव यांची वैयक्तिक कुठलीही भागीदारी नाही. परंतु या दोन्हीही ग्राहकापयोगी ब्रँड्सचं ते प्रतिनिधित्व करतात. ते रुची सोयाचे नॉन एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत त्यामुळे कायदेशीर रित्या त्यांना इनसाइडर मानलं जातं.

काय आहेत नियम?

अशाप्रकारे गुंतवणूकदारांना गॅरंटी देऊन शेअर्स खरेदी करण्यासाठी आमिष दाखवलं जाऊ शकत नाही. ते सेबीच्या नियमांविरुद्ध आहे. कुठलीही कंपनी अथवा त्याच्या अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी अशी विधान देऊ नयेत. शेअर बाजाराबद्दल(Share Market) कुठलीही व्यक्ती कुणाचाही असा सल्ला देऊ शकत नाही. जर एखादा व्यक्ती लोकांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असेल तर तो SEBI कडून मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लादार असायला हवा. SEBI च्या इतिहासात पाहिलं तर अशा प्रकरणात नेहमी कठोर पाऊल उचलली आहेत. २०१७ मध्ये अशाच एका प्रकरणात सेबीनं इमामीचे चेअरमेन आर.एस अग्रवाल यांना ८ लाखांचा दंड ठोठावला होता.  

टॅग्स :रामदेव बाबाशेअर बाजारगुंतवणूक