Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांच्या Patanjali नं सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त मागितली माफी, २ एप्रिलला हजर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 10:58 IST

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाला दिलेल्या हमीपत्रात कंपनी आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पुन्हा ही चूक करणार नसल्याचं नमूद केलं आहे. न्यायालयानं बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना २ एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितलंय. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दोघांनाही अवमानाची नोटीस बजावली होती आणि दोन आठवड्यांनंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आयएमएच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांविरोधात मोहीम चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. 

यापूर्वी मंगळवारी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठानं पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बाळकृष्ण यांना यापूर्वी जारी केलेल्या नोटिसांवर उत्तर न देण्यावरुन न्यायालयानं आक्षेप घेतला होता. न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचे प्रथमदर्शनी उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. बाबा रामदेव यांच्यावर अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी विचारणाही खंडपीठानं नोटीसद्वारे केली आहे. पतंजली आयुर्वेद ही लिस्टेड कंपनी पतंजली फूड्सची पेरेंट कंपनी आहे. 

न्यायालयात हजर राहण्याचे आदेश 

न्यायालयाने यापूर्वी बाबा रामदेव यांना नोटीस बजावून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून तीन आठवड्यात उत्तर मागवण्यात आलं आहे. याशिवाय कंपनीच्या जाहिराती छापण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कंपनीनं न्यायालयात हमीपत्रही दिलं होतं, मात्र असं असतानाही जाहिरात छापण्यात आली. त्यावर न्यायालयानं कठोर भूमिका घेतली होती. जाहिरातींमध्ये बाबा रामदेव यांच्या चित्राचाही समावेश करण्यात आला होता, त्यामुळे त्यांनाही पक्षकार करण्यात आलं होतं.

टॅग्स :रामदेव बाबापतंजली