भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानसोबत अझरबैजाननं मोठा करार केला आहे. हा करार २ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १७ हजार कोटी रुपये) आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था बळकट करणं हा यामागचा उद्देश आहे. दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच चांगले संबंध आहेत. आता ते एकमेकांना आर्थिक मदतही करतील.
अझरबैजानमधील ईसीओ शिखर परिषदेदरम्यान हा करार करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव्ह यांची भेट झाली. त्यानंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि अझरबैजानचे अर्थमंत्री मिकेल जब्बारोव्ह यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अझरबैजानमधील खंकेंडी येथे हा करार करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती अलीयेव आणि पंतप्रधान शरीफ उपस्थित होते.
व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ
रेडिओ पाकिस्ताननं दिलेल्या वृत्तानुसार, या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढेल. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष लवकरच पाकिस्तानात येणार आहेत. त्यानंतर या कराराशी संबंधित आणखी बाबींचा निर्णय घेतला जाईल. त्यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी ते यावर्षी पाकिस्तानला भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला मदतसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि अझरबैजानमधील संबंध सुधारले आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान अझरबैजानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. या कारवाईदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला होता. पाकिस्तान आणि अझरबैजान यांच्यातील संरक्षण सहकार्यही चांगलं आहे. आता त्यांना एकमेकांना आर्थिकदृष्ट्याही मजबूत करायचं आहे.
अझरबैजानने केवळ भारतासोबतचे संबंधच बिघडवले नाहीत, तर रशियाशीही संबंध बिघडवले आहेत. भारत आणि रशिया या दोन्ही देशांशी अझरबैजानची चांगली मैत्री होती. पण आता परिस्थिती बिकट झाली आहे. रशिया-अझरबैजान संबंध बिघडण्याची सुरुवात डिसेंबर २०२४ मध्ये झाली, जेव्हा रशियात अझरबैजान एअरलाइन्सचं विमान चुकून पाडण्यात आलं. ग्रोझनीजवळ झालेल्या या अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला होता.