Join us

15 हजार टन कांदा आयातीसाठी मंजुरी; आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:52 IST

onion : आयात केलेला कांदा नाफेडडून बंदर असलेल्या शहरांत पुरविला जाईल. राज्यांनी आपापली गरज नोंदविण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : १५ हजार टन कांदा आयात करण्यासाठी नाफेडने आयातदार (बीडर) निश्चित केले असून, आयातीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. कांद्याचे वाढते भाव नियंत्रात ठेवण्यासाठी ही आयात करण्यात येत आहे.आयात केलेला कांदा नाफेडडून बंदर असलेल्या शहरांत पुरविला जाईल. राज्यांनी आपापली गरज नोंदविण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे. कांद्याच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी नियमित निविदा जारी करण्याची नाफेडची योजना आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तुतीकोरीन आणि मुंबई बंदरांवर कांदा पुरविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नाफेडच्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाफेडने तातडीने संध्याकाळपर्यंतच निविदा मंजूर केल्या. कांदा वेळेवर बाजारात उपलब्ध व्हावा, असा नाफेडचा प्रयत्न आहे.

ग्राहकांच्या आवडी-निवडीचा आग्रह निविदा जारी करताना नाफेडने भारतीय ग्राहकांच्या आवडी-निवडीचा आग्रह धरला आहे. भारतीय ग्राहक मध्यम आकाराच्या कांद्याला प्राधान्य देतात. विदेशी कांदा साधारणपणे ८० मि.मी. पेक्षा जास्त मोठा असतो. असा कांदा यंदा आयात केला जाणार नाही. तशी अट निविदांत घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी एमएमटीसीने तुर्कस्तान आणि इजिप्तमधून पिवळा, गुलाबी आणि लाल कांदा आयात केला होता. या कांद्याचा आकार मोठा होता. त्यामुळे त्याला ग्राहकच मिळाला नव्हता.

टॅग्स :ऑनलाइन