Join us

जगभरात प्रत्येकाच्या हातात दिसेल मेड इन इंडिया आयफोन! बाबा कल्याणी घेणार पुढाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:01 IST

Apple Iphone : बहुतांश भारतीय तरुणांना त्यांच्याकडे आयफोन असावा असं वाटतं. मात्र, आता भारतात नाही तर जगभरात प्रत्येकाच्या हातात भारतीय आयफोन पाहायला मिळणार आहे.

Apple Iphone : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात आयफोन १६ लाँच करण्यात आला. देशातील काही निवडक शहरांमध्ये सुरुवातीला आयफोन सादर करण्यात आला. नवीन फोन घेण्यासाठी अ‍ॅपल शोरुमच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. यावरुन भारतीयांचे आयफोनप्रती असलेले वेड पाहायला मिळते. आता तर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात भारतीय आयफोन पाहायला मिळणार आहेत. मागच्याच वर्षी अ‍ॅपल कंपनीने आपले आयफोन निर्मितीचे युनिट भारतात हलवले होते. त्यामुळे आयफोन १६ हा पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. यापुढे जात अ‍ॅपल कंपनी आता मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. ही डिल यशस्वी झाली तर जगभरात मेड इन इंडिया आयफोन दिसतील.

अ‍ॅपल कंपनी भारत फोर्जसोबत करणार हातमिळवणी?अ‍ॅपल कंपनी सध्या मोठ्या प्रमाणात भारतात आयफोनची निर्मिती करत आहे. यातील पुढचं पाऊल म्हणजे आयफोनच्या लोकलायझेशनसाठी कंपनी प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने अ‍ॅपलने बाबा कल्याणी यांची कंपनी भारत फोर्जसोबत करार केला आहे. अ‍ॅपलने २०२० पासून भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले. येथे तयार केलेले बहुतेक आयफोन निर्यात केले जातात. २०२४ मध्ये सुमारे १२.८ अब्ज डॉलरचे (सुमारे ११०० अब्ज रुपये) आयफोन निर्यात करण्यात आले.

भारत फोर्ज अ‍ॅपलसोबत हातमिळवणी करणार?७६ वर्षांचे बाबा कल्याणी हे पुण्याचे 'भारत फोर्ज' सांभाळतात. त्यांची कंपनी ऑटोमोटिव्ह, बांधकाम, खाणकाम, रेल्वे, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात काम करते. अ‍ॅपलशी कंपनीची चर्चा यशस्वी झाल्यास, ते आयफोनसाठी लागणारे घटक तयार करू शकतात. ही भारतातील चौथी कंपनी असेल जी Apple iPhone साठी पुरवठादार म्हणून काम करेल. सध्या टाटा ग्रुप, मदरसन ग्रुप आणि इक्वस कंपनी अ‍ॅपलसाठी काम करत आहेत.

अ‍ॅपलच्या सर्वात मोठ्या पुरवठादारांपैकी एक असलेल्या अँपेरेक्स टेक्नॉलॉजीने हरियाणातील मानेसर येथे बॅटरी सेल्सचा कारखाना सुरू केला आहे, ज्याचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. मदरसन ग्रुपकडे हाँगकाँगच्या BIEL क्रिस्टल फॅक्टरीसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याचा सध्या सरकार विचार करत आहे. 

टॅग्स :अॅपलमोबाइलस्मार्टफोन