Join us  

अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 1:47 PM

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - राफेल प्रकरणावरुन टीकेचे धनी बनलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीला गुजरातमधील विमानतळांचे कंत्राट देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आर इन्फ्रा म्हणजे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 648 कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. याबाबत कंपनीकडूनच माहिती देण्यात आली आहे. आर इन्फ्राने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट मिळवले आहे. अनिल अंबानींचं राफेल करारानंतरचं हेआणखी एक यशस्वी उड्डाण ठरलं आहे.

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. हे विमानतळ अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्ग 8 ब येथून जाणाऱ्या मार्गावर बांधण्यात येत आहे. राजकोट विमानतळापासून हे विमानतळ केवळ 36 किमी अंतरावर आहे. या विमानतळाच्या कंत्राटासाठी लार्सन अँड टुर्बो, दिलीप बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्स यांसह 9 कंपन्यांनी टेंडर भरले होते. मात्र, सर्वात कमी बोली लावल्याने अंबानींच्या रिलायन्स कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. 

भारतीय विमान प्राधिकरणासोबत झालेल्या या करारात रनवे निर्मिती, टर्निंग पॅड, टॅक्सी लाईन, रस्ते, अग्निशामक स्थानिक, कुलिंग पिट, एअर फिल्ड ग्राऊंड लायटिंग योजनेचे परीक्षणसह नेव्हिगेशन आणि पक्षांमुळे होणारी अडचण कमी करण्यासाठीचा उपाय आदी कामांचा समावेश असल्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काम करण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर 30 महिन्यात म्हणजेच अडिच वर्षात हे काम पूर्ण करणे कंपनीला बंधनकारक आहे, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने एक परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली.    दरम्यान, यापूर्वी देशातील 5 विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे. अदानी समूहानं 6 विमानतळांसाठी बोली लावली होती. त्यापैकी 5 बोलींमध्ये त्यांना यश आलं. तर एका विमानतळाचा निर्णय शिल्लक राहिला होता. अदानी समूहानं विमान उड्डाण क्षेत्रात दमदार प्रवेश करत 5 विमानतळांचं 50 वर्षांसाठीचं कंत्राट मिळवलं. यामध्ये लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरु आणि त्रिवेंद्रमचा समावेश आहे. देशातील 5 मोठ्या विमानतळांच्या देखभाल, दुरुस्ती आणि अत्याधुनिकीकरणाचं कंत्राट पुढील 50 वर्षांसाठी अदानी समूहाकडे असणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं (एएआय) याबद्दलची माहिती दिली. 'मासिक प्रवासी शुल्क' या तत्त्वाच्या निकषावर अदानी समूहाला कंत्राट देण्यात आलं आहे. 'विमानतळांच्या लिलाव प्रक्रियेत इतर कंपन्यांपेक्षा अदानी समूहानं अतिशय आक्रमकपणे बोली लावल्या. आता औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडे 5 विमानतळांची जबाबदारी सोपवण्यात येईल', असं एएआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं होतं. 

टॅग्स :रिलायन्सअनिल अंबानीएअर इंडियाविमानतळगुजरात