Anil Ambani : सरते वर्ष 2024 अनिल अंबानींसाठी खूप चांगले होते. त्यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला. विशेषतः रिलायन्स पॉवरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. 2024 प्रमाणे आता 2025 देखील अनिल अंबानींसाठी खास असल्याचे दिसते. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे, ज्यावरुन अनिल अंबानी जबरदस्त कमबॅकसाठी सज्ज असल्याचे दिसून येते.
अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असलेल्या सासन पॉवर लिमिटेडने 31 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या एका मोठ्या कर्जाची परतफेड केली आहे. सासन पॉवरने या कर्जासाठी $ 150 मिलियन (सुमारे 1,284.6 कोटी रुपये) IIFCL, UK ला दिले आहेत. यामुळेच आज, म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स अपर सर्किटला आले.
कंपनीची आर्थिक स्थिती
कर्जाची परतफेड केल्याने सासन पॉवरची लिक्विडिटी, कर्ज कव्हरेज आणि क्रेडिट रेटिंग सुधारेल. याशिवाय, रिलायन्स पॉवरची बॅलेंस शीट मजबूत झाली, ज्यामुळे कंपनीचे लक्ष आता रिन्युएबल एनर्जीकडे वाढले आहे. याआधी, रिलायन्स पॉवरची आणखी एक उपकंपनी, रोजा पॉवरने सिंगापूरस्थित कर्जदार म्हणजेच लेंडर्स वर्डे पार्टनर्सला 850 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले होते.
सासन पॉवर काय करतेसासन पॉवर लिमिटेड मध्य प्रदेशातील सासन येथे 3960 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा मेगा पॉवर प्लांट (UMPP) चालवते. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्प आहे आणि त्याची कोळसा खाण क्षमता 20 MTPA (दशलक्ष टन प्रतिवर्ष) आहे. हा प्लांट भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि नवी दिल्ली या सात राज्यांमधील 14 डिस्कॉम वितरण कंपन्यांना 1.54 रुपये प्रति युनिट या सर्वात कमी दराने वीज पुरवतो. सुमारे 40 कोटी लोकांना याचा फायदा होतो.
रिलायन्स पॉवरचा विस्तार रिलायन्स पॉवर भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. सध्या कंपनीचा 5,300 मेगावॅटचा ऑपरेटिंग पोर्टफोलिओ आहे. कंपनीने इश्यूद्वारे 1,525 कोटी रुपये उभारण्याची योजनाही आखली आहे. रिलायन्स पॉवर वेगाने वाढणाऱ्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी या भांडवलाचा वापर करेल. सध्या रिलायन्स पॉवरची निव्वळ संपत्ती आता 15,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, ज्यामुळे कंपनीच्या वाढीला बळकटी मिळेल.