Join us

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा तोटा वाढला; शेअरमधूनही झालं मोठं नुकसान, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:34 IST

Reliance Infrastructure Share: या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ३,२९८.३५ कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४२१.१७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

Reliance Infrastructure Share: अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनं चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ३,२९८.३५ कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४२१.१७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ५,१२९.०७ कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ४,७१७.०९ कोटी रुपये होतं. या तिमाहीत कंपनीचा खर्च कमी होऊन ४,९६३.२३ कोटी रुपयांवर आला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ५,०६८.७१ कोटी रुपये होता.

शेअरमध्ये ७ टक्क्यांहून अधिक घसरण

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर तो शुक्रवारी ७ टक्क्यांहून अधिक घसरून २५० रुपयांच्या खाली आला. व्यवहाराअंती ६.५४ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. जून २०२४ मध्ये शेअरची किंमत १४३.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या शेअरने ३५०.९० रुपयांचा उच्चांक गाठला होता.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आहे. नुकतेच कंपनीने आपल्या व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पार्थ शर्मा यांची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

गेल्या वर्षी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहानं २०३० च्या वाढीच्या धोरणाचा भाग म्हणून रिलायन्स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर (आरजीसीसी) स्थापन करण्याची घोषणा केली होती. आरजीसीसीच्या कोअर टीममध्ये सतीश सेठ, पुनीत गर्ग आणि के राजा गोपाल या ग्रुपमधील अनुभवी लोकांचा समावेश आहे. गर्ग सध्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.

शेअरहोल्डिंग पॅटर्नरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर डिसेंबर तिमाहीपर्यंत प्रवर्तकांकडे १६.५० टक्के हिस्सा होता. तर, सार्वजनिक भागधारकांकडे ८३.३९ टक्के शेअर्स आहेत. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये अनिल अंबानी यांचं कुटुंबही आहे. त्यांच्याकडे ६,६३,४२४ शेअर्स म्हणजेच ०.१७ टक्के शेअर्स आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स