Anil Ambani Sebi: अनिल अंबानी यांच्या अडचणी सातत्यानं वाढत आहेत. येस बँकेत केलेल्या गुंतवणुकीची चौकशी थांबविण्याची मागणी करणारी त्यांची याचिका सेबीनं फेटाळून लावली आहे. त्यांना जवळपास १,८२८ कोटी रुपयांचा दंड लागू शकतो. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रिलायन्स म्युच्युअल फंडानं २०१६ ते २०१९ दरम्यान येस बँकेच्या अतिरिक्त टियर-१ बाँडमध्ये २१.५ अब्ज रुपये (२४५.३ मिलियन डॉलर्स) गुंतवणुकीशी संबंधित आहे.
गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
अंबानी समूहातील इतर कंपन्यांना येस बँकेकडून दिलेल्या कर्जाच्या बदल्यात ही गुंतवणूक करण्यात आल्याचं सेबीच्या चौकशीत समोर आलं आहे. २०२० मध्ये बँक दिवाळखोर घोषित झाली तेव्हा पैसे बुडाले आणि गुंतवणूकदारांचं सुमारे १८२८ कोटी रुपयांचं नुकसान झालं. रिलायन्स म्युच्युअल फंड २०१९ मध्ये निप्पॉन लाइफ इन्शुरन्सला विकण्यात आला असला तरी हे आरोप तेव्हाचे आहेत, जेव्हा तो अंबानींच्या ताब्यात होता.
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
सेबीच्या वार्षिक अहवालात सर्व काही स्पष्ट
सेबीनं आपल्या २०२४-२५ च्या अहवालात म्हटलंय की, आता त्यांच्याकडे सुमारे ७७,८०० कोटी रुपयांची वसुली थकबाकी आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत २ टक्क्यांनी अधिक आहे. अल्गोरिदम ट्रेडिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वाढता वापर लक्षात घेता सेबीने बाजारावर लक्ष अधिक कडक केलं आहे, असंही अहवालात म्हटलंय. त्याचबरोबर इन्साइडर ट्रेडिंग आणि संशयास्पद व्यवहारांवरही बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.
अनिल अंबानी, त्यांचे पुत्र जय अनमोल अंबानी आणि येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांनी स्वत:ची कोणतीही चूक मान्य न करता तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला होता, पण सेबीनं ७ जुलै रोजी तो फेटाळून लावला. आता सेबी अनिल अंबानी आणि त्यांच्या मुलाला प्रभावित गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊ शकते. याशिवाय त्यांना दंड ही ठोठावला जाऊ शकतो आणि कडक कारवाईही होऊ शकते.
ईडीनं अनेक ठिकाणी छापे टाकले
अंबानी समूह आणि येस बँक यांच्यातील व्यवहारांची चौकशी करणाऱ्या ईडीकडेही हे प्रकरण सोपवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात ईडीनं तीन हजार कोटी रुपयांच्या कथित कर्ज प्रकरणी अंबानी यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सेबीच्या नोटीसमध्ये अनिल अंबानी आणि त्यांच्या मुलाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचं म्हटलंय. रिलायन्स म्युच्युअल फंडाचे तत्कालीन सीईओ आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी संदीप सिक्का यांच्या मदतीनं या दोघांनी आपली पकड मिळवली.