Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस यांची अ‍ॅक्सिस बँकेतून निवृत्ती; २३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला भावनिक निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:20 IST

Amruta Fadnavis Retirement, Axis Bank: आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या भावूक प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

Amruta Fadnavis Retirement, Axis Bank: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतील आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर काम सुरु करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आज बँकेत 'सिनियर व्हाईस प्रेसिडेंट' (SVP) या पदावर असताना बँकेचा निरोप घेतला. आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या भावूक प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

मॅनेजमेंट ट्रेनी ते वरिष्ठ उपाध्यक्ष

अमृता फडणवीस यांनी २३ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत एका 'मॅनेजमेंट ट्रेनी'च्या रूपात आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली होती. आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने त्यांनी बँकेत विविध महत्त्वाची पदे भूषवली. ब्रँच ऑपरेशन्सपासून कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत आणि ट्रेझरीपासून कस्टमर रिलेशन्सपर्यंत त्यांनी बँकेच्या विविध विभागांत मोलाचे योगदान दिले. एका प्रशिक्षणार्थी पदापासून सुरू झालेला हा प्रवास बँकेच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचला.

संस्थेला मानले 'दुसरे घर'

आपल्या निरोप समारंभाच्या पोस्टमध्ये त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे आभार मानताना म्हटले की, ही संस्था केवळ कामाचे ठिकाण नव्हती, तर माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घर होते. इथून बाहेर पडताना माझे हृदय कृतज्ञतेने भरलेले आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. विशेषतः बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

नव्या प्रवासाची नांदी

अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही त्यांनी आपली नोकरी आणि व्यावसायिक कारकीर्द कधीही सोडली नाही. आता आयुष्यातील महत्त्वाचा अध्याय संपवून त्या जीवनाच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत आहेत. या निरोपानंतर त्या आपले पूर्ण लक्ष संगीत आणि सामाजिक कार्यावर केंद्रित करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मी या संस्थेतून आयुष्यभरासाठीचे धडे आणि अनेक मित्र घेऊन जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Amruta Fadnavis Retires from Axis Bank After 23 Years

Web Summary : Amruta Fadnavis retired from Axis Bank after 23 years, starting as a management trainee and rising to Senior Vice President. She expressed gratitude for her time at the bank, viewing it as a second home. Fadnavis plans to focus on music and social work.
टॅग्स :अमृता फडणवीसबँकदेवेंद्र फडणवीस