Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका अमेरिकन कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:12 IST

boeing lays off : अ‍ॅपलनंतर आणखी एका अमेरिकन कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. जागतिक आव्हानांमुळे कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे.

boeing lays off : २०२५ हे आर्थिक वर्ष भारतीय नोकरदारांसाठी आव्हानात्मक जात असल्याचे दिसत आहे. यापूर्वी टेक क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. यामध्ये अ‍ॅपल, सॅमसंग, फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत सापडली असून त्याचे परिणाम भारतावर होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस कंपनीनेही मोठी नोकरकपात केली. त्यानंतर आता आणखी एका अमेरिकन कंपनीने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. विमान उत्पादक कंपनी बोईंगने बेंगळुरू येथील आपल्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील १८० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बोईंगने नोकर कपातीचा निर्णय का घेतला?जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या बोइंगचे भारतात सुमारे ७,००० कर्मचारी आहेत. भारत ही कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बोईंग भारतातील ३०० पेक्षा जास्त पुरवठादारांकडून दरवर्षी सुमारे १.२५ बिलियन डॉलरची खरेदी करते. गेल्या वर्षी, बोईंगने जागतिक स्तरावर कंपनीत १० टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सुत्राने सांगितले की, नोकर कपाती योजनेचा एक भाग म्हणून, बोईंगने २०२४ च्या डिसेंबर तिमाहीत बेंगळुरूमधील त्याच्या बोईंग इंडिया इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सेंटरमधील १८० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या संदर्भात बोईंगकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

बोईंग कंपनीच्या सेवेवर परिणाम होणार नाहीसूत्राने सांगितले की, कंपनी या टाळेबंदीचा त्यांच्या ग्राहकांसह आणि सरकारच्या कामकाजावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले. यासाठी कंपनीने धोरणात्मक कर्मचारी कपात केली आहे. ज्यामुळे मर्यादित संख्येच्या पदांवर परिणाम झाला आहे. बेंगळुरू आणि चेन्नई येथील बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्रात (BIETC) जटिल आधुनिक वैमानिक काम केले जाते. बेंगळुरूमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान परिसर हा कंपनीच्या यूएस बाहेरील सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे.

सुनिता विल्यम्स यांना अवकाशात घेऊन जाणारे विमान बोईंगचेच बोईंग ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. विमान निर्मिती, संरक्षण प्रणाली, अंतराळ तंत्रज्ञान आणि संबंधित सेवांच्या आसपास त्याची मुख्य व्यवसाय केंद्रे आहेत. अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांना अवकाशात घेऊन जाणारे अंतराळयान बोईंग या कंपनीची निर्मिती आहे. ज्यामध्ये स्पेस स्टेशनवर उतरताना बिघाड झाला होता. त्यानंतर इलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्याला सुरिक्षित पृथ्वीवर आणलं आहे. 

टॅग्स :अमेरिकाविमानमहागाई