सणासुदीच्या काळात अनेक ग्राहक ऑनलाइन शॉपिंगलाही पसंती देत असतात. ई-कॉमर्स कंपन्या दिवाळीच्या सुमारास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत असतात. दरम्यान Amazon या ई-कॉमर्स कंपनीनं मराठमोळ्या ग्राहकांच्या सोयीसाठी आता मराठीतही शॉपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचसोबत आता विक्रेत्यांनाही मराठीत व्यवहार करता येणार आहेत. मार्केटप्लेसमध्ये आता विक्रेत्यांना मराठी, मल्याळम, तेलुगु आणि बंगाली या भाषांमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे, तसंच त्यांचा व्यवहार पाहता येणार आहे.
आगामी सणासुदीच्या कालावधीकडे पाहता हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याच्या मदतीनं अनेक विक्रेते, संभाव्य विक्रेते आणि नव्या विक्रेत्यांना आपला व्यवहार सुरू ठेवण्यासाठी निरनिराळ्या स्तरांच्या बाजारातून लाभ मिळेल. तसेच ते आपल्याला हव्या असलेल्या भाषेतूनही काम करू शकतील, असं Amazon नं एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे.