Join us

अदानी समुहाविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू! 'या' आरोपामुळे अडचणी वाढल्या; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 14:48 IST

अदानी समुहाविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू! 'या' आरोपामुळे अडचणी वाढल्या; नेमकं प्रकरण काय?

उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. अदानी समूहाविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू आहे. एका अहवालानुसार, लाचखोरीच्या आरोपावरून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. उर्जा प्रकल्पात त्यांना हवे असलेले काम करून देण्यासाठी अदानी समूह किंवा त्याच्याशी संलग्न कंपन्या भारतीय अधिकाऱ्यांना लाच  देत होते का याबाबत चौकशी सुरू आहे. 

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरला; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Axis बँक घसरला

भारतीय अक्षय ऊर्जा कंपनी, Azure Power Global Ltd चाही या तपासात समावेश आहे. याआधी गेल्या वर्षी 'हिंडेनबर्ग रिसर्च' या अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनीने अदानी समूहाविरोधात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर त्यांच्या समभागांच्या किमतींमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता. मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्गचा हा अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला होता.

चौकशीची माहिती नाही

याबाबत आता अदानी समुहाने प्रतिक्रिया दिली आहे. अदानी समुहाचे म्हणणे आहे की, भारतातील आणि जागतिक स्तरावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यांचे पालन करतो. समुहाला आपल्या चेअरमनांविरुद्ध कोणत्याही तपासाची माहिती नाही. याआधीही 'हिंडेनबर्ग रिसर्च' या अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनीने अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. याचेही समुहाने खंडन केले होते. अदानी समूह आणि अझूर हे दोन्ही भारताच्या अक्षय ऊर्जा उद्योगातील प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांनी सौर प्रकल्पांसाठी करार जिंकले आहेत.

बेकायदेशीर पेमेंट्सच्या आरोपांदरम्यान ॲझूरला गेल्या वर्षी समस्यांचा सामना करावा लागला होता. यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून त्यांना हटवण्यात आले. गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांसह मागील सर्व आरोपांचे खंडन केले होते.

टॅग्स :गौतम अदानीअदानी