Sunil Mittal Haier Stake: एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. याच दरम्यान दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सुनील मित्तल एका चिनी कंपनीसोबत मोठ्या कराराची तयारी करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील मित्तल हे चिनी कंपनी हायर स्मार्ट होमच्या भारतीय युनिटमधील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी करत आहेत. याद्वारे मित्तल कुटुंब आणखी एका व्यवसाय क्षेत्रात प्रवेश निश्चित करणार आहे.
मित्तल १७,००० कोटी रुपये चिनी कंपनीत गुंतवणार भारती एअरटेल कंपनी दूरसंचार क्षेत्रात देशातील दुसरी आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल आपलं व्यवसाय क्षेत्र वाढवण्याच्या तयारीत आहे. मित्तल यांनी २ अब्ज डॉलर्स (सुमारे १७,००० कोटी रुपये) किमतीच्या या करारासाठी खाजगी इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकसशी हातमिळवणी केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, काही मंजुरी प्रलंबित आहेत ज्यामुळे हा करार पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. पुढील काही आठवड्यात हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या कराराबद्दलची चर्चा सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हायर कंपनी आपला हिस्सा विकण्यास नकार देऊ शकते. सध्या, सुनील मित्तल आणि वारबर्ग पिंकस यांच्या प्रतिनिधींनी या करारावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. याशिवाय, हायर कंपनी देखील या प्रकरणात कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्याचे टाळत असल्याचे दिसून येते.
कंपनीच्या महसुलात ३० टक्के वाढगेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही अशीच बातमी आली होती की कंपनी भारतीय युनिटमधील २५ ते ४९ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. नोव्हेंबरमध्ये, सिंगापूरच्या टेमासेक होल्डिंग्ज पीटीई आणि जीआयसी पीटीई आणि अबू धाबीच्या सॉवरेन वेल्थ फंड मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनीने गुंतवणूक करण्यास रस दाखवला होता. हायर कंपनीने २९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दक्षिण आशियातील कंपनीचा महसूल ३०% पेक्षा जास्त वाढला आहे. त्याच वेळी, कंपनीचा साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्समध्ये २१ टक्के वाटा आहे.
वाचा - भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
सुनील मित्तल यांची संपत्ती किती आहे?भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल लवकरच हायर कंपनीसोबत करार पूर्ण करतील अशी आशा आहे. दरम्यान, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, सुनील मित्तल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती २८ अब्ज डॉलर (२.३९ लाख कोटी) आहे.