Join us

Air India: एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला पगारवाढ करण्याचा, कपात मागे घेण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:46 IST

Air India Salary: कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता. हा पगार परत केला जाणार आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाटाटा ग्रुपच्या ताब्यात गेल्यावर अनेक बदल होत आहेत. कर्मचाऱ्यांवर अटी आणि शर्थी लागू करतानाच कंपनीने आणखी एक मोठी भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने कर्मचाऱ्यांना पेन्शन आणी पीएफचा लाभ देऊ केला होता. आता पगार आणि अलाऊन्सेसवर मोठा निर्णय घेतला आहे. 

कोरोना काळात कर्मचाऱ्यांचा पगार आणि अलाऊंसेस कापण्यात आले होते. ते परत केले जाणार आहेत. याचबरोबर पगारातही मोठी वाढ केली जाणार आहे. टाटा ग्रुपने पगार आणि अलाऊंसेसमध्ये रिस्ट्रक्चरिंग करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार एअर इंडिया तीन्ही एअरलाईन्सच्या पायलट तसेच क्रू मेंबरला पूर्ण पगार देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता, ज्यामुळे पायलट आणि क्रू यांचे मूळ वेतन, उड्डाण भत्ता आणि लेओव्हर भत्ता (आंतरराष्ट्रीय) कापला गेला. या प्रकरणाशी संबंधित टाटा समूहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी कर्मचाऱ्यांसाठी भत्ते, रजा धोरण आणि इतर उपाययोजनांवर विचार करत आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी कंपनी असल्याने एअर इंडियामध्ये या व्हेरिएबल्सबाबत अनेक गुंतागुंत आहेत. आता ते टाटा समूहाच्या विमान कंपन्यांच्या धोरणाशी जोडण्याची गरज आहे. टाटा समूहाने अलीकडेच सरकारकडून एअर इंडियाचे अधिग्रहण केले आहे. विमान कंपनीत १२,०८५ कर्मचारी आहेत, त्यापैकी ८,०८४ कायम आहेत.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची पगार रचना गुंतागुंतीची आहे. टाटा समूह हे सुलभ करेल आणि त्यांच्या इतर एअरलाइन्सप्रमाणेच एक फ्रेमवर्क विकसित करेल. समूहाने एअर इंडियाचे परिचालन आणि सेवा दर्जा सुधारण्यासाठी 100 दिवसांची योजना सुरू केली आहे.

टॅग्स :एअर इंडियाटाटा