Join us
Daily Top 2Weekly Top 5

Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 08:29 IST

Air India CEO Resigns: एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाहा काय आहे कारण, कंपनीसमोर काय आहेत आव्हानं?

Air India CEO Resigns: एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, जोपर्यंत नवीन सीईओची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत ते कंपनीसोबत काम करत राहतील. 'हिंदुस्तान टाइम्स'नं या प्रकरणाची माहिती असलेल्या चार व्यक्तींच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. एअर इंडिया सध्या ऑपरेशनल समस्या, वाढता खर्च आणि या वर्षातील विक्रमी तोट्याची शक्यता अशा अनेक आव्हानांचा सामना करत असताना हा बदल समोर येत आहे.

बोर्ड बैठकीत राजीनामा मंजूर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बोर्डाच्या बैठकीत विल्सन यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. नवीन सीईओ येईपर्यंत, म्हणजे शक्यतो सप्टेंबरपर्यंत, विल्सन आपल्या पदावर राहतील. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये संपणार होता, परंतु ते एक वर्ष आधीच पद सोडत आहेत. या विषयावर एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

नवीन सीईओचा शोध सुरू

विल्सन यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काम सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच नवीन सीईओचा शोध सुरू करण्यात आला होता. विल्सन सप्टेंबर २०२२ मध्ये एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर कंपनीत रुजू झाले होते. सध्या एअर इंडिया अनेक उमेदवारांशी चर्चा करत असून, या संदर्भात पुढील आठवड्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र, संभाव्य उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

आव्हानांच्या काळात बदल

एअर इंडिया सध्या अनेक संकटांतून जात आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे हवाई क्षेत्रावर निर्बंध आले आहेत, परिणामी विमानांना लांबचा प्रवास करावा लागत असून इंधन खर्चात मोठी वाढ झाली आहे. यासोबतच विमानांची कमतरता आणि वाढता खर्च कंपनीवर दबाव निर्माण करत आहे. जून २०२५ मध्ये झालेल्या बोइंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताचा परिणामही कंपनीवर झाला आहे; अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर झालेल्या या अपघातात २४१ लोकांचा मृत्यू झाला होता.

मोठ्या आर्थिक तोट्याची भीती

अहवालांनुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एअर इंडियाला सुमारे २०,००० कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो. अशा परिस्थितीत नवीन सीईओसमोर कंपनीला या कठीण काळातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान असेल. विशेष म्हणजे, या वर्षी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात अनेक मोठे बदल होत असून, देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोमध्येही अलीकडेच सीईओ स्तरावर बदल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Air India CEO Resigns Amid Challenges; Company Seeks New Leader.

Web Summary : Air India's CEO, Campbell Wilson, resigned, staying until a successor is found. Operational issues, rising costs, and potential losses plague the airline. A search for a new CEO began in January, with board meetings underway. The company faces significant financial challenges and industry-wide changes.
टॅग्स :एअर इंडियाटाटाव्यवसाय