IT Jobs : आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. लोक आता रोजच्या आयुष्यातही एआयचा वापर करायला लागले आहेत. मात्र, याचा विपरित परिणामही पाहायला मिळतोय. जगभरातील आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि टेक कंपन्यांच्या कार्यपद्धतीत यामुळे मोठे संरचनात्मक बदल दिसून येत आहेत. खर्च कपात करणे आणि कामाची कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाटेत टीसीएस, एक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि विप्रो यांसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. ज्यामुळे पुणे आणि बंगळूरु सारख्या आयटी हबमधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये नोकरकपात१. टीसीएस :भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांची नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.हा आकडा कंपनीच्या एकूण जागतिक मनुष्यबळाच्या अंदाजे २% आहे. AI ची वाढती मागणी आणि संरचनात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
२. विप्रो आणि एचसीएल टेक :विप्रो कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी, रिपोर्ट्सनुसार कंपनीने २४,५१६ नोकऱ्या कमी केल्या आहेत.एचसीएल टेकने देखील पुनर्रचना आणि गुंतवणुकीतील बदलांमुळे २०२४ मध्ये सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांची छटणी केली आहे.
जागतिक कंपन्यांचा AI वर भर१. एक्सेंचर :जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एक्सेंचरने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. हा निर्णय AI च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर 'संरचनात्मक सुधारणां'चा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
२. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट:गुगलने AI प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन विभागातील १०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे.मायक्रोसॉफ्टनेही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसह संपूर्ण संस्थेमध्ये सुमारे ६,००० नोकरकपातीची घोषणा केली आहे.
३. सेल्सफोर्स आणि इतर कंपन्या:अमेरिकेतील क्लाउड कंपनी सेल्सफोर्सने त्यांच्या ग्राहक समर्थन विभागातून सुमारे ४,००० कर्मचारी कमी केले आहेत.कॉग्निझंटने ३,५०० कर्मचारी, तर आयबीएम इंडियाने देखील सुमारे १,००० नोकरीची पदे कमी केली आहेत.
रोजगाराच्या स्थितीवर काय परिणाम?या मोठ्या नोकरकपातीमागे AI चा वाढता वापर आणि जागतिक आर्थिक दबाव ही दोन प्रमुख कारणे आहेत.१. AI आणि स्वयंचलनावर भर: कंपन्या आता मनुष्यबळाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपला खर्च कमी करू इच्छित आहेत. यामुळे जी कामे AI करू शकते, त्या पारंपरिक आयटी भूमिकांमध्ये नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.२. जागतिक दबाव: अमेरिकेकडून H-1B व्हिसा शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव तसेच जागतिक मंदीची भीती यामुळे कंपन्यांवर खर्चात कपात करण्याचा दबाव वाढला आहे.
वाचा - श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?या सगळ्याचा थेट परिणाम भारतातील रोजगाराच्या स्थितीवर होत असून, आयटी क्षेत्रात आता नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर आणि एआय-संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करणे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक झाले आहे. पारंपारिक आयटी नोकऱ्यांमध्ये घट होत असताना, AI आणि डेटा सायन्स संबंधित क्षेत्रांत मात्र मागणी वाढत आहे.