Apple Production In India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज टेक कंपनी अॅपलला भारतात उत्पादन थांबवण्यास सांगितलं होतं. परंतु कंपनीनं याउलट भारतात उत्पादन वाढवलंय. तैवानची महाकाय इलेक्ट्रॉनिक कंपनी फॉक्सकॉननं बंगळुरू येथील त्यांच्या नवीन प्रकल्पात आयफोन-१७ चं उत्पादन सुरू केल्याची माहिती समोर आलीये. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली. हे फॉक्सकॉनचं दुसरं सर्वात मोठे उत्पादन युनिट आहे. सध्या या प्लांटमध्ये आयफोन-१७ कमी प्रमाणात तयार केले जात आहेत. फॉक्सकॉन आधीच चेन्नई येथील त्यांच्या प्रकल्पात आयफोन-१७ चं उत्पादन करत आहे. कंपनीनं अद्याप या संदर्भात अधिकृत विधान दिलेलं नाही.
फॉक्सकॉन ही आयफोन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. चीनबाहेर त्यांचा दुसरा सर्वात मोठा कारखाना बंगळुरूजवळील देवनहल्ली येथे बांधला जात आहे, ज्यात सुमारे २.८ अब्ज डॉलर्सची (२५,००० कोटी रुपये) गुंतवणूक केली जात आहे. 'फॉक्सकॉनच्या बंगळुरू येथील प्रकल्पात आयफोन-१७ बनवण्यास सुरुवात झाली आहे,' अशी माहिती एका सूत्रानं दिली. मिंटनं यांदर्भातील वृत्त दिलंय.
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
अॅपलची योजना
शेकडो चिनी अभियंते अचानक परतल्यानं आयफोन-१७ चं उत्पादन काही काळासाठी विस्कळीत झालं होतं. दरम्यान, फॉक्सकॉनने ही कमतरता भरून काढण्यासाठी तैवानसह अनेक ठिकाणांहून तज्ज्ञांना बोलावलं आहे. अन्य सूत्रांनुसार, अॅपलनं या वर्षी आयफोनचे उत्पादन ६ कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे, जे २०२४-२५ मध्ये सुमारे ३.५ कोटी ते ४ कोट युनिट्स होतं. कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात सुमारे २२ अब्ज डॉलर्स किमतीचे ६०% अधिक आयफोन असेंबल केले होते.
कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी ३१ जुलै रोजी आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर सांगितले की, जून २०२५ मध्ये अमेरिकेत विकले गेलेले बहुतेक आयफोन भारतातून आयात केलेले आहेत. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर चर्चा करताना कुक यांनी घोषणा केली होती की जून तिमाहीत अमेरिकेत विकले गेलेले सर्व आयफोन भारतातून पाठवले जातील. दुसऱ्या तिमाहीत भारतात अॅपलचा पुरवठा वार्षिक आधारावर १९.७% वाढला. अशा प्रकारे, देशाच्या स्मार्टफोन बाजारात तिचा वाटा ७.५% होता. आयडीसीच्या मते, जून तिमाहीत चीनी कंपनी विवोनं १९% वाट्यासह भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत आघाडी घेतली.