Join us

सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 10:12 IST

या चीनी कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत रिलायन्सची स्पर्धा सुनील मित्तल यांच्या भारती ग्रुपशी आहे. ही स्पर्धा टेलिकॉम क्षेत्रासारखीच आहे, जिथे या दोन्ही कंपन्या आधीच एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आता चर्चेत आहे. हायर या मोठ्या चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या भारतीय युनिटमधील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत ही कंपनी सामील झालीये. हायरला भारतात आपला व्यवसाय वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्याला एका भारतीय कंपनीला आपला भागीदार बनवायचं आहे.

इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, या शर्यतीत रिलायन्सची स्पर्धा सुनील मित्तल यांच्या भारती ग्रुपशी आहे. ही स्पर्धा टेलिकॉम क्षेत्रासारखीच आहे, जिथे या दोन्ही कंपन्या आधीच एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम

किती हिस्सा विकणार?

एलजी आणि सॅमसंगनंतर हायर अप्लायन्सेस इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनी आपला २५ ते ५१ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. या कंपनीला एमजी मोटर्ससारखी रचना तयार करायची आहे, ज्यात भारतीय कंपनी सर्वात मोठी भागधारक बनेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचं मूल्यांकन २ ते २.३ अब्ज डॉलर्स इतकं असू शकतं. यात कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रीमियमचाही समावेश असणार आहे. मोठ्या फॅमिली ऑफिसेस आणि खाजगी इक्विटी फंडांना हिस्सा विकण्यासाठी हायर गेल्या वर्षाच्या उत्तरार्धापासून सिटीसोबत मिळून बोलणी करत आहे.

 टॅरिफसोबत जोडलंय कनेक्शन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर चिनी कंपन्या आता भारतातील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. कारण अमेरिकेत टॅरिफमुळे त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे चिनी कंपन्यांना आता भारतात आपला व्यवसाय वाढवायचा आहे.

काय आहे या दोन्ही कंपन्यांचा प्लॅन?

रिलायन्सनं या वर्षाच्या सुरुवातीला नॉन बाइंडिंग ऑफर्स देऊन शर्यतीत एन्ट्री केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सच्या सल्लागारांनी हायरचं मुख्यालय असलेल्या चिंगदाओ येथे थेट हायरशी संपर्क साधलाय. उद्योगातील दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मित्तल हे काही आठवड्यांपूर्वी हायरच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला भेटण्यासाठी चीनला गेले होते.

या संभाव्य अधिग्रहणासाठी रिलायन्स रिटेल युनिट एक माध्यम ठरणार असल्याचं समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सला अजूनही एकट्यानं पुढे जायचं आहे. रिलायन्स आधीच बीपीएल आणि केल्विनेटरसारख्या परवानाधारक ब्रँडसह इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपला व्यवसाय वाढवत आहे. मात्र, रिलायन्सने रिकनेक्ट आणि वायझरसारख्या स्थापन केलेल्या ब्रँड्सना फारसं यश मिळालेलं नाही.

टॅग्स :चीनभारतसुनील भारती मित्तलमुकेश अंबानी