Join us

LIC Bima Sakhi योजना काय आहे, महिन्याला किती मिळणार पैसे? पात्रता आणि अर्ज कसा कराल? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:57 IST

LIC Bima Sakhi Yojana for women: राज्यातील लाडकी बहीण योजनेनंतर सध्या एलआयसीच्या विमा सखी योजनेची चर्चा सुरू आहे. ही योजना सुशिक्षित महिलांसाठी असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशानं सुरू होत आहे.

LIC Bima Sakhi Yojana for women: राज्यातील लाडकी बहीण योजनेनंतर सध्या एलआयसीच्या विमा सखी योजनेची चर्चा सुरू आहे. ही योजना सुशिक्षित महिलांसाठी असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशानं सुरू होत आहे. १८ ते ७० वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिला विमा सखी योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेचा भाग बनणाऱ्या महिलांना 'विमा सखी' म्हणून ओळखले जाईल. ते आपल्या परिसरातील महिलांना विमा मिळवून देण्यासाठी मदत करतील, ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

या योजनेअंतर्गत सुशिक्षित महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये आर्थिक समज आणि विम्याचं महत्त्व पटवून दिलं जाणार आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर या दहावी उत्तीर्ण महिलांना एलआयसीमध्ये विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे. याशिवाय पदवी उत्तीर्ण इन्शुरन्स सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे.

काय आहेत अटी?

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडे किमान मॅट्रिक/हायस्कूल/दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
  • सर्व विमा योजनांमध्ये सामील होण्यासाठी एक निश्चित वयोमर्यादा आहे. १८ ते ७० वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
  • एलआयसीची विमा सखी केवळ महिलांसाठी आहे. ही शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर दहावी उत्तीर्ण महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार असून या काळात त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पैसे मिळतील.
  • विमा एजंट म्हणून महिलांना स्वावलंबी बनविणं आणि त्यांना आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण देणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विक्रीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित होईल.
  • या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही संस्थेची कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. म्हणजेच या योजनेअंतर्गत ज्यांची नियुक्ती केली जाणार आहे, त्यांना संस्थेचं नियमित कर्मचारी मानलं जाणार नाही आणि त्यांना वेतन ही दिलं जाणार नाही. हे लोक प्रशिक्षणार्थी किंवा सहाय्यक म्हणून काम करतील आणि त्यांना निश्चित स्टायपेंड दिलं जाईल. त्यांना महामंडळाच्या कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांचे अधिकार व लाभ मिळणार नाहीत.
  • योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी कामगिरीचे काही निकष पूर्ण करावे लागतील. योजनेचें यश आणि सहभागींची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी हे निकष निश्चित केले जातात.

दरमहा ७ हजार रुपये मिळणार

या योजनेच्या सुरुवातीला महिलांना दरमहा ७ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षी ही रक्कम ६००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दरमहा दिले जातील. ज्या विमा सखींनी आपलं टार्गेट पूर्ण केलं त्यांना स्वतंत्र कमिशनही दिलं जाईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३५ हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे. त्यानंतर आणखी ५० हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल.

कसा कराल अर्ज?

  • सर्वप्रथम एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://licindia.in/test2 जा.
  • आता खाली असलेल्या Click here for Bima Sakhi या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर आपलं नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, पत्ता भरा.
  • आता तुम्ही एलआयसी इंडियाच्या कोणत्याही एजंट/डेव्हलपमेंट ऑफिसर/कर्मचारी/मेडिकल एक्झामिनरशी संबंधित असाल तर त्याविषयी माहिती द्या. शेवटी, कॅप्चा कोड भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. 

कोणती कागदपत्रं आवश्यक?

यामध्ये अर्ज करण्यासाठी वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. याशिवाय वरील तीनही कागदपत्रं महिला उमेदवारानं सेल्फ अटेस्टेड केलेली असावी. अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

टॅग्स :एलआयसीपैसासरकार