Adani In Mahakumbh : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात ४० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. नुकतंच प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी या महाकुंभात सेवा करण्यासाठी दररोज १ लाख भाविकांना मोफत प्रसाद वाटप करण्याची घोषणा केली. त्यासाठी अदानी समूहाने इस्कॉनशी हातमिळवणी केली आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दररोज लाखो लोकांना महाप्रसादाचे मोफत वाटप केल्यानंतर आता गौतम अदानी या महाकुंभात भाविकांना एक कोटी आरती संग्रहाच्या प्रती मोफत वाटणार आहेत. त्यासाठी अदानी समूहाने गीता प्रेसशी हातमिळवणी केलीये.
गीता प्रेसशी हातमिळवणी
गौतम अदानी यांनी भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी समर्पित गीता प्रेस या संस्थेशी हातमिळवणी केली असून महाकुंभात भाविकांना एक कोटी मोफत आरती संग्रह वितरित करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. "महाकुंभ हा भारतीय संस्कृती आणि धार्मिक श्रद्धेचं महायज्ञ आहे! या महायज्ञातील गीता प्रेस या नामांकित संस्थेच्या सहकार्यानं कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी आरती संग्रहालयाच्या एक कोटी प्रती मोफत देत आहोत, ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे," असं गौतम अदानी म्हणाले.
गीता प्रेसच्या प्रतिनिधींनी गौतम अदानी यांच्याशी झालेल्या बैठकीत या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसंच या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवासात अदानींचा सहभाग सनातन धर्माच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावेल. या उपक्रमामुळे 'विश्वगुरु भारत'च्या निर्मितीस मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.