Join us
Daily Top 2Weekly Top 5

IndiGo Fuel Surcharge: इंडिगोनं प्रवासाचा विचार करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आजपासून तिकीट महागणार, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 07:57 IST

IndiGo Fuel Surcharge: एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीनं तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली आहे. काय आहे यामागचं कारण?

IndiGo Fuel Surcharge: एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. विमान कंपनीनं आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर ४२५ रुपयांपासून २,३०० रुपयांपर्यंत 'फ्यूल सरचार्ज' (इंधन अधिभार) लावण्याची घोषणा केली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे विमान इंधनाच्या (ATF) दरात झालेल्या प्रचंड वाढीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. १४ मार्चपासून बुक होणाऱ्या तिकिटांवर हे नवीन दर लागू होतील.

आजपासून नवीन दर लागू

इंडिगोनं दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्चपासून बुक होणाऱ्या तिकिटांवर इंधन अधिभार वसूल केला जाईल. कंपनीनं म्हटलंय की, "इंडिगो ही भारताची आघाडीची विमान कंपनी असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर 'फ्यूल चार्ज' सुरू करत आहे. हे बदल १४ मार्च २०२६ रोजी रात्री ००:०१ वाजल्यापासून प्रभावी ठरतील. मध्य पूर्वेतील भू-राजकीय संकटामुळे विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, IATA च्या 'जेट फ्यूल मॉनिटर'नुसार या भागात इंधनाचे दर ८५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत."

एटीएफ हा ऑपरेटिंग कॉस्टचा मोठा हिस्सा

विमान कंपनीनं पुढे स्पष्ट केलं की, एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) हा विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चाचा एक मोठा भाग असतो. किमतींमध्ये झालेल्या या अचानक आणि मोठ्या वाढीचा इंडिगोसह सर्व विमान कंपन्यांच्या खर्चावर आणि नेटवर्कवर मोठा परिणाम होईल. इंडिगोच्या मते, इंधनाच्या किमतीतील वाढीचा पूर्ण भार सोसण्यासाठी भाड्यात मोठी वाढ करणं आवश्यक होतं, परंतु ग्राहकांवरील ताण विचारात घेऊन 'फ्यूल चार्ज' म्हणून तुलनेनं कमी रक्कम वाढवण्यात आली आहे.

एअर इंडियाने यापूर्वीच लावला होता अधिभार

इंडिगोच्या आधी, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने वाढत्या परिचालन खर्चामुळे १२ मार्चपासून प्रत्येक देशांतर्गत उड्डाणाच्या तिकिटावर ३९९ रुपये इंधन अधिभार लावण्याची घोषणा केली होती. एअरलाइन समूहानं सांगितलं की, आखाती देशांमधील परिस्थितीमुळे जेट इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता, हा अधिभार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर वेगवेगळ्या टप्प्यात लागू केला जाईल.

आंतरराष्ट्रीय मार्गांवर असे असतील दरपहिल्या टप्प्यात १२ मार्चपासून प्रत्येक देशांतर्गत तिकिटावर ३९९ रुपये अधिभार लावला जाईल. एअर इंडियानं स्पष्ट केलं की, हाच अधिभार सार्क (SAARC) देशांच्या उड्डाणांवरही लागू होईल. पश्चिम आशियातील मार्गांसाठी हा अधिभार प्रति तिकीट १० अमेरिकन डॉलर असेल. तर आफ्रिकेच्या उड्डाणांसाठी हे शुल्क ३० डॉलरवरून ९० डॉलरपर्यंत वाढेल. तसंच दक्षिण-पूर्व आशियातील सेवांसाठी हा सरचार्ज २० डॉलरवरून ६० डॉलर इतका होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo Hikes Ticket Prices: Fuel Surcharge Introduced Amid Rising Costs.

Web Summary : IndiGo introduces fuel surcharge (₹425-₹2,300) on domestic and international flights from March 14th due to rising aviation fuel costs. This follows Air India's similar move. Geopolitical tensions significantly impacted fuel prices, prompting the airline to partially pass costs to passengers.
टॅग्स :इंडिगोएअर इंडियाअमेरिका-इस्रायल-इराण वॉर