खलील गिरकर
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगातील हवाई वाहतूकीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक देशांनी लादलेल्या बंधनांमुळे विविध विमान कंपन्यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना परिस्थितीत सकारात्मक बदल होईपर्यंत विनावेतन रजा घेऊन घरी बसण्यास सांगितले आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रातील कर्मचाºयांमध्ये भविष्याबाबत धास्ती आहे.मुंबईतील एका समीर पटेल (नावात बदल) नामक केबिन क्रू ला तर अवघ्या वर्षभरात दोन मोठे आर्थिक धक्के बसले आहेत. भविष्य अंधकारमय झाल्याने त्यांना भविष्याची चिंता वाटू लागली आहे.
अवघ्या सव्वा वर्षापर्यंत समीरचे आयुष्य अगदी मजेत चालले होते. जेट एअरवेजमध्ये वरिष्ठ केबिन क्रू म्हणून समीर कार्यरत होता तर त्याची पत्नी वरिष्ठ हवाई सुंदरी म्हणून जेटमध्येच कार्यरत होती. दोघांची सर्व्हिस जास्त झालेली असल्याने दोघांना गलेलठ्ठ पगार होता. अचानक दक्षिण मुंबईतील त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा घाट घालण्यात आल्याने त्यांनी मीरा रोड मध्ये नवीन घर कर्ज काढून विकत घेतले. नवरा व बायको दोन्ही जण कमावत असल्याने एकाच्या पगारात कर्जाचा मोठा हफ्ता व दुसºयाच्या पगारात घरखर्च असे त्यांचे नियोजन होते. घर घेण्यासाठी रक्कम गुंतवण्यासाठी तोपर्यंत जमा केलेली सर्व जमापुंजी, दागदागिने त्यांनी विकून घर खरेदी केले. त्यानंतर काही काळ विना व्यत्यय त्यांच्या नियोजनाप्रमाणे सर्व काही सुरळीत सुरु होते. अचानक डिसेंबर २०१८ पासून जेट एअरवेजच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला व त्या दांपत्यांचे वेतन थकले. कसाबसा त्यांनी त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस एप्रिलच्या मध्यास जेट एअरवेज अधिकृतरित्या बंद पडली. त्यांचे वेतन व इतर बचत त्यासोबत जेटमध्येच अडकली.दोघांची नोकरी गेल्यानंतर पत्नीला घरी थांबावे लागले. तर समीरला मुंबईपासून तब्बल सहा हजार किमी अंतरावरील फिनलँड येथील फिन एअरवेजमध्ये सप्टेंबर महिन्यात नोकरी मिळाली.मात्र त्याच्या दुर्देवाचे फेरे काही त्याची पाठ सोडायचे नाव घेत नसल्यासारखी परिस्थिती होती. तिथे काम करुन अवघे सहा सात महिने होत नाहीत तोपर्यंत कोरोनाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने हवाई कंपन्यांनी आपापली उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कंपनीने समीरला विना वेतन रजा घेण्याचे निर्देश दिले. एक एप्रिल पासून समीर मीरा रोड येथे घरात बसून आहे. जेट एअरवेजची नोकरी गेल्यानंतर महत्प्रयासाने त्याला ही नोकरी मिळाली होती.दिल्लीत विमान आल्यानंतर दिल्लीत राहणे किंवा मुंबईला येण्यासाठी त्याला स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत होता. कुटुंबियांपासून दूर राहून पोटासाठी तो फिनलँडला गेला होता. मात्र कोरोनाचा फटका सध्या त्याच्या आई वडिलांच्या निवृत्तीवेतनावर त्यांचे घर चालले आहे. ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याची भीती त्याच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसून येते.‘हवाई वाहतूक सुरळीत होण्यास मोठा काळ लागणार’एकीकडे वेतन सुरु नसले तरी घरासाठी काढलेल्या कर्जाचे हफ्ते मात्र वेळेवर घेण्यासाठी बँकांकडून तगादा लावला जात आहे. आरबीआयने आवाहन केल्यानंतरही अनेक बँकांनी कर्जाचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे हे संकट कधी एकदाचे दूर होईल व आपण पुन्हा एकदा कामावर रुजू होऊ याची प्रतीक्षा समीर करत आहे.सरकारने गरीबांसाठी विविध योजनांद्वारे मदत जाहीर केली असली तरी मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्गातील समीरसारख्या ज्या व्यक्तींना काम बंद झाल्याने वेतनाशिवाय घरी बसावे लागत आहे त्यांची मोठी आर्थिक ओढाताण होत आहे.हे संकट टळल्यावर हवाई वाहतुकीला मार्गावर येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.