Join us  

ठरलं! ‘या’ महिन्यात Adani विल्मरचा IPO येणार; कंपनी ३ हजार ६०० कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 3:01 PM

अदानी विल्मर ही अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपची संयुक्त उद्योग कंपनी आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवरही पाहायला मिळत आहे. सन २०२२ च्या सुरुवातीला शेअर बाजाराच्या निर्देशांकांत मोठी घसरण दिसून आली. मात्र, अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांचे आयपीओ शेअर मार्केटमध्ये सादर केले जात आहे. Adani ग्रुपच्या विल्मर कंपनीचा सादर केला जाणार आहे. मात्र, कंपनीने आयपीओचा आकार कमी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

खाद्यतेल कंपनी अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरचा आकार ४ हजार ५०० कोटी रुपयांवरुन ३ हजार ६०० कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे. फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाची विक्री करणारी कंपनी अदानी विल्मरचा आयपीओ याच जानेवारी महिन्यात येण्याची अपेक्षा आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे. 

अदानी विल्मर निधीचा उपयोग कुठे आणि कसा करणार?

अदानी विल्मर ही अहमदाबादस्थित अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपची संयुक्त उद्योग कंपनी आहे. आयपीओ अंतर्गत कंपनीला ४,५०० कोटी रुपये उभे करायचे होते. मात्र, आता कंपनी ३ हजार ६०० कोटी रुपयांसाठी आयपीओ सादर करणार आहे. आयपीओमधून मिळालेल्या रकमेपैकी १९०० कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील. ११०० कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि ५०० कोटी रुपये धोरणात्मक अधिग्रहण आणि गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वापरले जातील, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू (JSW) समूहाच्या बंदर विकास शाखेने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून रोख्यांच्या माध्यमातून ४० कोटी डॉलर उभारण्याची घोषणा केली असून, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरने जारी केलेल्या रकमेचा वापर कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. बाँड मार्केटमध्ये कंपनीचा हा पहिलाच इश्यू आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :अदानीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार