Adani Bribery Case: उद्योगपती गौतम अदानी यांची एक समस्या दूर होते, तर दुसरी येते. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने जानेवारी 2022 अदानींवर खात्यांमध्ये फेरफार केल्याचे आरोप केले होते. त्या आरोपातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर सेबी प्रमुखांशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप करण्यात आले. त्या आरोपातून बाहेर आल्यानंतर आता त्यांच्यावर लाचखोरीचे आरोप करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या न्याय विभागाने अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह 7 जणांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गौतम अदानींविरोधात समन्सही जारी करण्यात आले आहेत. हे आरोप उघड झाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले, आता त्यांच्यावर चौफेर संकटे वाढू लागली आहेत. केनिया, बांग्लादेश आणि श्रीलंकेतून अदानींसाठी वाईट बातम्या येऊ लागल्या आहेत.
अदानी अडचणीतअमेरिकेत अदानीवरील आरोपांनंतर इतर देशांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही बाब उघड झाल्यानंतर केनिया सरकारने अदानींसोबतचे दोन करार रद्द केले आहेत. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी अदानींसोबत वीज आणि विमानतळ विस्तारीकरणाशी संबंधित प्रकल्प थांबवण्याबाबत चर्चा केली. सुमारे 6000 कोटी रुपयांचा सौदा अडकला आहे.
बांग्लादेश तपास करणारअमेरिकेत अदानी यांच्यावर आरोप झाल्यानंतर शेजारील बांग्लादेशनेही चौकशीची मागणी केली. बांग्लादेशने शेख हसीना यांच्या कारकिर्दीत अदानी पॉवर ट्रेडिंगसोबत केलेल्या कराराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अदानी यांनी स्वाक्षरी केलेल्या सात करारांसह प्रमुख वीज निर्मिती करारांचे पुनरावलोकन करण्यासाठी कायदेशीर आणि तपासक संस्था नियुक्त केली जाईल.
श्रीलंकेने धक्का दिलाकेनिया आणि बांग्लादेशपाठोपाठ श्रीलंकेतही अदानी समूहाला धक्का बसला आहे. अदानीचे श्रीलंकेतील प्रकल्प धोक्यात आले आहेत. अनुरा कुमारा दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने अदानी ग्रीनसह समूहाच्या इतर प्रकल्पांवरील अंतिम निर्णय स्थगित ठेवला आहे. या प्रकरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.