Join us

अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 05:39 IST

सौरऊर्जा कंत्राटे मिळविण्यासाठी २,१०० कोटींच्या लाचेचा आरोप; अदानी कंपन्यांचे समभाग २२.९९ टक्क्यांनी खाली येऊन गुंतवणूकदारांचे तब्बल २.४५ लाख कोटी रुपये बुडाले.

न्यूयॉर्क/नवी दिल्ली : वाढीव दराने सौरऊर्जेची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतातील काही राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलरची (२,१०० कोटी रुपये) लाच दिल्याच्या आरोपावरून अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या न्यायिक विभागाने बुधवारी खटला दाखल केला. आराेपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स गुरुवारी पडले. परिणामी, सेन्सेक्स ४२२ अंकांनी तर निफ्टी १६८ अंकांनी घसरला. 

अदानी कंपन्यांचे समभाग २२.९९ टक्क्यांनी खाली येऊन गुंतवणूकदारांचे तब्बल २.४५ लाख कोटी रुपये बुडाले.

न्यूयॉर्क न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह ७ जणांविरुद्ध ‘यूएस सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ने २ खटले दाखल केले आहेत. एका खटल्यात अदानी ग्रीन एनर्जी व तिचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि कंपनीचा माजी सीईओ विनीत जानी यांना, तर दुसऱ्या खटल्यात दिल्लीतील अझुअर पॉवर कंपनी व तिच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. 

अदानींना अटक करा : गौतम अदानी यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी खा. राहुल गांधी यांनी केली.

भाजपाचा हल्लाबोल : भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले की, संसदेचे अधिवेशन तोंडावर असताना हे प्रकरण काढण्यात आले आहे. हे संशयास्पद आहे. 

'आम्ही कायद्याचे पालन करणारे', अदानी समूहाने आरोप फेटाळले 

नवी दिल्ली : अमेरिकेत दाखल खटल्याप्रकरणी अदानी समूहाने एक निवेदन जारी केले असून, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समूहावरील सर्व आरोप निराधार असून, आम्ही कायदे पालन करणारी संस्था आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे.

खटल्याचे वृत्त आल्यानंतर जारी निवेदनात समूहाने म्हटले की, भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याबाबतचे आपल्यावरील आरोप पूर्णत: निराधार असून, आम्ही या प्रकरणी सर्व प्रकारच्या कायदेशीर मार्गांचा वापर करू.समूहाच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले की, अमेरिकी न्यायिक विभागाने स्वत:च म्हटल्यानुसार, हे केवळ आरोप आहेत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत बचाव पक्ष निर्दोषच असतो. आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारच्या कायदेशीर साधनांचा वापर केला जाईल.

समूहाने पुढे म्हटले की, आम्ही प्रशासकीय प्रणाली, पारदर्शकता आणि नियमपालन याबाबत सर्वोच्च दर्जाची बांधिलकी पाळतो. आम्ही आमचे हितधारक, भागीदार आणि कर्मचारी यांना पूर्ण खात्री देऊ इच्छितो की, आम्ही एक कायदेपालन करणारी संस्था आहोत. सर्व कायद्यांचे अनुपालन आम्ही पूर्णांशाने करतो.

टॅग्स :अदानीगौतम अदानीअमेरिकाभ्रष्टाचार