Join us

अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:43 IST

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे.

Adani Dharavi Project: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा लवकरच कायापालट होणार आहे. उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी धारावीचा पुनर्विकास करणार आहे. निवडणुकीच्या काळात या प्रकल्पाबाबत राज्यात बरेच राजकारण झाले. मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, या प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अदानी समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलले आहे.

काय आहे नवीन नाव?अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL)ने आपले नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) केले आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, नवभारत मेगा डेव्हलपर्स, हे नाव कंपनीच्या वचनबद्धतेवर, वाढ, बदल आणि आशा, या ब्रँडिंगवर आधारित आहे. यासाठी संचालक मंडळ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे.

कंपनी आणि राज्य सरकारचा उपक्रमकंपनीने म्हटले की, 'नवभारत' नाव या प्रकल्पाची क्षमता दर्शविते. शिवाय, या नावातील बदलामुळे सरकारची भूमिका किंवा प्रकल्पाचा मूळ उद्देश बदलणार नाही. दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाचा 80 टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा 20 टक्के वाटा आहे. नवीन नावाच्या कंपनीतील शेअरहोल्डिंग अपरिवर्तित राहणार आहे. 

काय आहे अदानींची योजना?मीडिया रिपोर्ट्सनुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्प ही केवळ पुनर्विकास योजना नाही. धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येतोय. 1960 च्या दशकात सिंगापूरची परिस्थिती आजच्या धारावीसारखी होती. पण आज सिंगापूर हे संपूर्ण जगासमोर उदाहरण आहे.

धारावीची जमीन न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या आकारमानाच्या तीन-चतुर्थांश आहे. धारावीमध्ये 8.5 लाखांहून अधिक लोक राहतात. म्हणजे येथे प्रति चौरस किलोमीटर परिसरात 354,167 लोक राहतात. ही जगातील सहावी सर्वात दाट वस्ती आहे. यात गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सर्वाधिक लोक राहतात. 

टॅग्स :अदानीधारावीगौतम अदानीमुंबईव्यवसाय