Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gautam Adani: गौतम अदानींचा नवा रेकॉर्ड, बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय उद्योगपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:27 IST

अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

नवी दिल्ली-

अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यासोबतच ते भारतातील असे पहिले व्यक्ती बनले आहेत की ज्यांनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. कॉलेज ड्रॉपआऊट असलेल्या गौतम अदानींनी सुरुवातीला हिरे आणि कोळशाचा व्यवसाय करत आज विविध उद्योगांमध्ये आपलं नाव कमावलं आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात आशियातील एखाद्या व्यक्तीला तिसऱ्या क्रमांकावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत भारताचे दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी आणि चीनचे जॅक मा देखील या स्थानापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता १३७.४ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यासह, त्यांनी ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे सारुन अदानींनी तिसरं स्थान गाठलं आहे. श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी आता फक्त इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या मागे आहेत. इलॉन मस्क टेस्लाचे सीईओ आहेत तर जेफ बेजोस अॅमेझॉन कंपनीचे मालक आहेत. मस्क आणि बेजोस दोघेही अमेरिकन आहेत.

ब्लूमबर्गच्या यादीत कोण-कोण?ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क 251 अब्ज डॉलरसह पहिल्या स्थानावर आहेत. मस्क नुकतेच सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत घेतल्यानं आणि नंतर डीलमधून बाहेर पडल्यामुळे चर्चेत आले होते. मस्क यांचा ट्विटरशी असलेला वाद जुना मानला जातो. 

दुसऱ्या स्थानावर Amazon चे जेफ बेजोस आहेत, ज्यांची संपत्ती 153 अब्ज डॉलर इतकी आहे.  ई-कॉमर्स क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. गेल्या एका दिवसात त्याच्या संपत्तीत 981 दशलक्ष डॉलरर्सची घट झाली आहे. असे असूनही ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.

अदानीच्या नेट वर्थमध्ये किती वाढ झाली?भारताचे गौतम अदानी १३७ अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. गेल्या एका दिवसाचा लेखाजोखा पाहिला तर त्याची एकूण संपत्ती १.१२ बिलियन डॉलरनं वाढली आहे. यासह त्यांनी बर्नार्ड अर्नॉल्टला चौथ्या स्थानावर टाकलं आणि तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष बाब म्हणजे ब्लूमबर्गच्या यादीत गौतम अदानी हे आशियातील तिसरे व्यक्ती आहेत ज्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. 

टॅग्स :अदानी