Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समुहाची अणुऊर्जा क्षेत्रात एन्ट्री; 'या' नावानं सुरू होणार नवी कंपनी, काय आहे Adani Group चा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:06 IST

Adani Atomic Energy: अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवर लिमिटेडने अणुऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकत एका नव्या कंपनीची सुरुवात केली आहे. पाहा काय आहे समुहाचा प्लॅन.

Adani Atomic Energy: अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवर लिमिटेडने अणुऊर्जा (Nuclear Energy) क्षेत्रात पाऊल टाकत 'अदानी ॲटोमिक एनर्जी लिमिटेड' (AAEL) ही नवीन उपकंपनीची स्थापना केली आहे. कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन युनिट वीज निर्मिती, ट्रान्समिशन आणि वितरणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं काम करणार आहे. ही पूर्णपणे अदानी पॉवरच्या मालकीची उपकंपनी असेल, ज्यामध्ये मूळ कंपनीचा १०० टक्के हिस्सा राहील. या नवीन कंपनीची ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली असून ती अणुऊर्जा क्षेत्रातील कामकाजासाठी सज्ज झाली आहे.

शांती कायद्यामुळे मार्ग मोकळा

अदानी समूहाचे हे पाऊल अशा वेळी आले आहे जेव्हा संसदेने डिसेंबर २०२५ मध्ये 'शांती' (SHANTI) कायदा मंजूर केला होता. या कायद्याचा मुख्य उद्देश भारतातील नागरी अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करणं हा आहे. सरकारचं लक्ष्य २०४७ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता १०० गिगावॉटपर्यंत पोहोचवण्याचं आहे. याच पार्श्वभूमीवर मोठे कॉर्पोरेट समूह आता या क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत. या नवीन उपकंपनीचं अधिकृत भांडवल सध्या ५ लाख रुपये ठेवण्यात आले असून, ते १० रुपये दर्शनी मूल्याच्या ५० हजार इक्विटी शेअर्समध्ये विभागलं गेलंय. ही एक धोरणात्मक एन्ट्री मानली जात असून भविष्यात यामध्ये मोठे प्रकल्प येण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची किंमत

तिसऱ्या तिमाहीत नफा आणि महसुलात घट

अदानी पॉवरनं डिसेंबर २०२५ च्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २,४८८ कोटी रुपयांपर्यंत खाली आला असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात सुमारे १५ टक्क्यांची घट झाली आहे. कामकाजातून मिळणारं उत्पन्नही ९ टक्क्यांनी घसरून १२,४५१ कोटी रुपयांवर आलंय. परंतु, कंपनीचा 'एबिटा' मार्जिन ३६.५ टक्क्यांवर पोहोचला असून, वार्षिक आधारावर यात सुधारणा झाली आहे.

खर्च कमी होऊनही उत्पन्नावर दबाव कायम

इंधन खर्च आणि वित्तीय खर्चात झालेल्या घसरणीमुळे कंपनीला काहीसा दिलासा मिळाला आहे, तरीही एकूण उत्पन्नातील घसरणीमुळे नफ्यावर दबाव कायम राहिला. कंपनीचा एकूण खर्च कमी होऊन १०,०५० कोटी रुपयांवर आला असला, तरी करपूर्व नफ्यात (Profit Before Tax) वार्षिक आधारावर सुमारे २७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Adani Group Enters Nuclear Energy; New Company Launched: Details Here

Web Summary : Adani Group's Adani Power enters nuclear energy with 'Adani Atomic Energy Limited'. This move follows India opening its nuclear sector to private companies. Despite a profit dip in Q3, Adani Power's strategic entry signals long-term investment plans in nuclear energy.
टॅग्स :अदानीगौतम अदानी