Join us  

नवी युद्धभूमी, नवा संघर्ष! अदानी, अंबानी, टाटा भिडणार; भविष्यातील ऊर्जेसाठी वर्चस्वाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 2:52 PM

नव्या ऊर्जेसाठी तीन बड्या समूहांचा संघर्ष; वर्चस्वासाठी तीन उद्योगपती लढणार

सध्या देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असून वीज संकट दिवसागणिक तीव्र होत आहे. भविष्यात पारंपारिक ऊर्जास्रोत कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सरकारनं अपारंपारिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केलं आहे. सौर, पवन ऊर्जेवर भर दिला जात आहे. २०३० पर्यंत देशात सौर ऊर्जेचं उत्पादन वाढवून ४५० गीगावॅटपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. या क्षेत्रात खासगी कंपन्या सक्रिय होताना दिसत आहेत.

अदानी समूह, रिलायन्स आणि टाटा समूहातील कंपन्यांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं आहे. या क्षेत्रात विस्तार करण्याची योजना कंपन्यांनी आखली आहे. विशेषत: अदानी आणि रिलायन्स समूहानं अतिशय आक्रमकपणे काम सुरू केलं आहे. त्यामुळे पुढील दशकभर या दोन कंपन्यांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळू शकतो. या दोन्ही कंपन्यांमधील संघर्षामुळे सौर ऊर्जेच्या किमती बऱ्याच खाली येऊ शकतात.

अंबानी आणि अदानी यांनी पारंपारिक ऊर्जा क्षेत्रात चांगले पाय रोवले आहेत. रिलायन्सकडे जगातील सर्वात मोठं रिफायनिंग संकुल आहे. तर अदानी समूह औष्णिक ऊर्जेच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. एका दशकात १०० गीगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचं लक्ष्य रिलायन्सनं ठेवलं आहे. जून २०२१ मध्येच मुकेश अंबानी यांनी याबद्दलची घोषणा केली. 

रिलायन्सनं गेल्या रविवारी दोन मोठे करार केले. मुकेश अंबानींनी चायना नॅशनल ब्ल्यूस्टार ग्रुपच्या आरईसी सोलर होल्डिंग्सच्या अंतर्गत येणाऱ्या आरईसी समूहाचं अधिग्रहण करत असल्याची घोषणा केली. रिलायन्स आरईसीमधील १०० टक्के भागिदारी करणार आहे. हा करार ५ हजार ७९२ कोटी रुपयांचा आहे. यासोबतच रिलायन्सच्या अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडनं स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेडमधील ४० टक्के भागिदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीरिलायन्सटाटा