लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: एसी आणि ३२ इंचाहून मोठ्या टीव्हीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या सरकारच्या प्रस्तावामुळे येत्या सणासुदीच्या काळात या उपकरणांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे एसीच्या किमतीमध्ये मॉडेलनुसार ₹१,५०० ते ₹२,५०० पर्यंत घट होऊ शकते, तर टीव्हीच्या किमतीही कमी होतील. या निर्णयामुळे ग्राहकांना कमी दरात ही उत्पादने खरेदी करणे शक्य होईल आणि विजेची बचत करणाऱ्या मॉडेल्सची मागणीही वाढेल.
किंमत कमी होईल : एसीवरील जीएसटी कमी झाल्यास ग्राहकांना थेट फायदा होईल आणि किमती सुमारे १० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात.
मागणी वाढेल : एसी आणि मोठ्या टीव्हीची मागणी वाढेल. यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळेल व विक्री २० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
उद्योग क्षेत्राची अपेक्षा : ब्लू स्टार, पॅनॅसॉनिक, गोदरेज या कंपन्यांनी निर्णयाचे स्वागत करत ग्राहकांकडून या वस्तूंचा उपयोग वाढेल, असे म्हटले आहे.
जोरदार तेजीने निफ्टी, सेन्सेक्स वधारले
जीएसटी रचनेत प्रस्तावित बदलांमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ६७६ अंशांनी वाढून ८१,२७३ वर पोहोचला, तर निफ्टीनेही २४,८७६ चा टप्पा गाठला. ऑटोमोबाईल आणि ग्राहक वस्तूंच्या शेअर्सनी यामध्ये आघाडी घेतली. मारुती, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटसारखे शेअर्स तेजीत होते.
अमेरिका आणि रशियामध्ये युक्रेन युद्धाबद्दल झालेली चर्चा आणि भारताच्या पतमानांकात झालेली वाढ यामुळेही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. या सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजारातील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.