Join us

स्टेशनवरच आधार, पॅन कार्ड, मोबाइल रिचार्ज, वीजबिल भरणा, तिकीटासह विमाही काढता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:29 IST

रेलटेलने देशातील ६०९० स्थानकांवर सार्वजनिक वायफाय सेवा उपलब्ध केली असून, ते जगातील मोठ्या वाय-फाय नेटवर्कपैकी एक बनले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आता सामान्यांना रेल्वेस्थानकावर आधार व मतदान कार्ड तयार करून मिळण्याची सुविधा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाची कंपनी रेलटेल संपूर्ण भारतात रेल्वेस्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करणार आहे. यामुळे रेल्वेस्थानकांवर येणाऱ्यांना ट्रेन, बस यांच्या तिकीट बुकिंग, आधार कार्ड, मतदान कार्ड, मोबाइल रिचार्ज, वीजबिल भरणा, पॅन कार्ड, बँकिंग, विमा यांच्यासह अनेक सुविधा मिळणार आहेत.

ही योजना सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड (सीएससी एसपीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारा चालवली जाते. ही सेंटर ग्रामस्तरीय उद्योजकांमार्फत चालवली जातील. वाराणसी रेल्वेस्थानक आणि प्रयागराज रेल्वेस्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहेत. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होत आहे.

६,०९० स्थानकांवर दिली वायफाय सेवाही सेंटर जवळपास २०० पेक्षा जास्त स्थानकांवर सध्या उभी करण्यात येणार आहेत. यामधील ४४ दक्षिण मध्य रेल्वे, २० इशान्य रेल्वेस्थानकांमध्ये तर १३ पूर्व मध्य रेल्वे, १५ पश्चिम रेल्वे, २५ उत्तर रेल्वेमध्ये, १२ पश्चिम मध्य रेल्वेस्थानकांवर बसवणार आहेत. पूर्व समुद्री मार्गावर १३, तर ५६ ईशान्य रेल्वेमध्ये ही सेंटर उभारणार आहेत. रेलटेलने देशातील ६०९० स्थानकांवर सार्वजनिक वायफाय सेवा उपलब्ध केली असून, ते जगातील मोठ्या वाय-फाय नेटवर्कपैकी एक बनले आहे.

टॅग्स :रेल्वे