FMCG Products Price Hikes : महाराष्ट्र सरकारने कालच राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर १५०० रुपये वर्ग केलेत. मात्र, हा आनंद त्यांना फार काळ अनुभवता येईल असं वाटत नाही. कारण, येत्या दिवसांत स्वयंपाक घराचं बजेट बिघडू शकते. एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्पातून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोठी घोषणा होईल, अशी आस सर्वसामान्यांना लागली आहे. अशा परिस्थितीत फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपन्या (FMCG) चहा, साबण आणि बॉडी वॉशसह काही उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात.
स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू महाग होण्याची शक्यता
लाडक्या बहिणींना आता स्वयंपाक घरातील सामान भरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. साबण, शाम्पू, डिटर्जंट, सौंदर्य प्रसाधने आणि खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या पाम तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. खाण्याच्या तेलापासून सौंदर्य प्रसाधनातील अनेक वस्तूंसाठी पाम तेलाचा वापर होतो. आता पाम तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी नफा वाढवण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवणार असल्याचा इशारा दिला आहे.
या कंपन्या वाढवणार किमती?
देशातील आघाडीची FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने नुकतेच तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले. नफा का कमी झाला याचं कारण कंपनीने दिले. डिसेंबर तिमाहीत पाम तेलाच्या किमती ४०% वाढल्या आहेत. चहाच्या किमती दरवर्षी २४% वाढल्या. पण, त्याच कालावधीत अनुक्रमे ७% घसरल्या. दरम्यान, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीने आधीच किमती वाढवल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आता उत्पादनांच्या किमती वाढणार असल्याचे सांगितले आहे.
अर्थसंकल्पात महिलांना काळ मिळणार?
गेल्या काही निवडणुकांमध्ये महिलांना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना लोकप्रिय ठरत आहेत. राज्यातील लाडकी बहीण योजनेने महायुतीला घवघवीत यश दिलं. त्यामुळे आता केंद्रातूनच लाडकी बहीण योजना सुरू करणार असल्याची चर्चा आहे. तसं झालं तर महिलांना राज्य आणि केंद्र अशा २ योजनांचा लाभ मिळू शकतो.