Join us

Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 08:44 IST

Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी हे प्रकरण त्याच्या जॉब पोस्टिंगशी संबंधित आहे ज्यामध्ये त्यांनी पहिल्या वर्षी पगार देणार नसल्याचं म्हटलं होतं.

Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी हे प्रकरण त्याच्या जॉब पोस्टिंगशी संबंधित आहे ज्यामध्ये त्यांनी पहिल्या वर्षी पगार देणार नसल्याचं म्हटलं होतं. ही अट सर्वोत्तम उमेदवारांची निवड करण्यासाठी फिल्टरसारखीच होती, असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी आपल्या 'चीफ ऑफ स्टाफ' पदासाठी उमेदवाराला पहिल्या वर्षी कोणतंही वेतन दिलं जाणार नसल्याचं सांगितलं होतं. त्याऐवजी त्या उमेदवाराला झोमॅटोच्या फीडिंग इंडिया उपक्रमाला त्यांना २० लाख रुपयांची देणगी द्यावी लागणार आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती.

१८००० पेक्षा अधिक अर्ज

यानंतर गोयल यांनी एक अपडेट दिली. "या पदासाठी कंपनीला १८ हजारांपेक्षा अधिक अर्ज मिळाले. ही सामान्य भरती नव्हती. जसं काही लोकांनी म्हटलं की तुम्हाला २० लाख रुपये द्यावे लागतील, हा केवळ एक फिल्टर होता. याद्वारे आम्हाला त्या लोकांना शोधायचं होते, जे कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे नेणाऱ्या संधीला महत्त्व देतील. जे उमेदवार पैसे देण्याची गोष्ट करत आहेत, त्यांचे अर्ज बाद केले जातील," असं गोयल म्हणाले.

याआधी गोयल यांनी या पदासाठी अर्ज केलेल्या लोकांची माहिती दिली होती. अर्जदारांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, काही असेही उमेदवार आहेत ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत. अनेक अर्ज खूप विचार करून भरले गेले होते. अर्जाची प्रक्रिया संध्याकाळी ६ वाजता बंद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

झीरो सॅलरीवर संताप

इंटरनेट युझर्सनं गोयल यांच्या त्या गोष्टीवर टीका केली की ज्यात त्यांनी 'डाऊन टू अर्थ' चीफ ऑफ स्टाफच्या शोधात आहेत, ज्यांना एक वर्षासाठी 'शून्य वेतन' देण्याचं म्हटलं होतं. मात्र, निवड झालेल्या उमेदवाराला दुसऱ्या वर्षापासून सामान्य वेतन देण्यात येईल, असं दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु, पहिल्या वर्षानंतर निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी म्हटलेलं. वार्षिक ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, असे आश्वासन त्यांनी दिलं होतं.

टॅग्स :झोमॅटोनोकरी