India Restrictions On Bangladesh: भारतानेबांगलादेशला जोरदार झटका दिलाय. बांगलादेशी जूट वस्तूंच्या आयातीवर नव्यानं निर्बंध लादण्यात आले आहेत. जूटचे कपडे, दोरी आणि पोत्यांवर हे निर्बंध आहेत. आता भारत-बांगलादेश सीमेवरील कोणत्याही लँड पोर्टवरून हा माल येऊ शकणार नाही. ते न्हावा शेवा (Nhava Sheva) बंदरातूनच आणता येणारे. डीजीएफटीनं सोमवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम होईल. बांगलादेशही भारतीय वस्तूंवर अनेक निर्बंध लादतो, असं भारताचं म्हणणं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.
भारतानं बांगलादेशातून येणाऱ्या ज्यूटच्या वस्तूंवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतलाय. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं (डीजीएफटी) नवा नियम जारी केलाय. त्यानुसार बांगलादेशातून ज्यूटपासून बनवलेल्या काही वस्तू आता भारतातील केवळ एका बंदरातून येऊ शकतील. हे बंदर म्हणजे न्हावा शेवा. पूर्वी भारत-बांगलादेश सीमेवरील अनेक बंदरांमधून हा माल येत होता. पण, आता तसं होणार नाही.
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
नवे नियम तात्काळ लागू
हा नियम तात्काळ लागू करण्यात आला आहे. भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या कोणत्याही बंदरातून बांगलादेशातून येणारा माल आणण्यास परवानगी दिली जाणार नाही. न्हावा शेवा बंदरातूनच ते आणता येणार आहे. म्हणजेच जूटपासून बनवलेले कपडे, दोरी आणि पोती आता न्हावा शेवा बंदरातूनच भारतात प्रवेश दिला जाणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार गेल्या काही काळापासून सुरू आहे. यापूर्वी भारतानं बांगलादेशातून येणाऱ्या काही वस्तूंवर बंदी घातली होती. यामध्ये रेडिमेड कपडे आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंचा समावेश होता. आता जूटच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशही भारतीय वस्तू आपल्या देशात येण्यापासून रोखत असल्यानं भारतानं हे पाऊल उचललं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विशेषत: त्या वस्तू ज्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जातात. मे महिन्यात भारतानं बांगलादेशातून रेडिमेड कपडे कोलकाता आणि न्हावा शेवा बंदरातूनच आणण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी भारतानं, बांगलादेश आपल्या लँड पोर्टमधून भारतीय माल येऊ देत नसल्याचं म्हटलं होतं.
व्यापार धोरणांमुळे भारताला नुकसान
बांगलादेशच्या व्यापार धोरणांमुळे आर्थिक नुकसान होत असल्याचं भारताचं म्हणणं आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये व्यवसाय करणं अवघड झालंय. याचं कारण म्हणजे बांगलादेश आपल्या बंदरातून भारतीय वस्तू आणण्यावर खूप जास्त शुल्क लावतो. त्यामुळे त्या राज्यांमध्ये उद्योगांचा विकास होत नाही. बांगलादेशातून येणारा माल आपल्या बंदरं आणि विमानतळांवरून इतर देशांमध्ये पाठविण्याचा करार भारतानं काही महिन्यांपूर्वी रद्द केला होता. हा करार सुमारे पाच वर्षे जुना होता. या प्रकरणावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. बांगलादेश भारतातून आयात होणाऱ्या तांदूळ, कापूस आणि सूत यासारख्या वस्तूंवर जास्त कर लावतो. यामुळे प्रादेशिक विकासात अडथळा येत असल्याचं भारताचं म्हणणं आहे.
शेख हसीना यांचं सरकार गेल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध आणखी बिघडले आहेत. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध चांगले चाललेले नाहीत. त्यांनी एकमेकांच्या वस्तूंवर अनेक बंधनं घातली आहेत. यामुळे दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.