Join us  

साडेचार वर्षांत जनतेच्या खात्यांत ५.७८ लाख कोटी केले जमा-मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:34 AM

जनेतच्या कल्याणासाठी व विकासासाठी केंद्र सरकार जेव्हा एक रुपया पाठविते, तेव्हा त्यातील १५ पैसेच तुमच्यापर्यंत पोहोचतात, या माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या विधानाचा हवाला देत, ही संस्कृती आम्ही बदलून टाकली

वाराणसी : जनेतच्या कल्याणासाठी व विकासासाठी केंद्र सरकार जेव्हा एक रुपया पाठविते, तेव्हा त्यातील १५ पैसेच तुमच्यापर्यंत पोहोचतात, या माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या विधानाचा हवाला देत, ही संस्कृती आम्ही बदलून टाकली असून, साडेचार वर्षांत विविध योजनांचे तब्बल ५ लाख ७८ हजार कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यांत जमा केले आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला.प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनात पंतप्रधानांनी अनिवासी भारतीय हे भारताचे अ‍ॅम्बॅसडर आहेत, असे सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, भारत आता विविध कार्यांत जगाचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय सौर मित्र कराराद्वारे आपल्याला ‘एक जग,एक सूर्य व एक ग्रिड’ निर्माणकरायचे आहे. ज्या पक्षाची इतकी वर्षे देशात सत्ता होती, त्यांनी व्यवस्थेत कोणतेच बदल केले नाहीत. लूट थांबविण्याचाही प्रयत्न केला नाही, पण आम्ही मात्र १५ पैसेच जनतेपर्यंत पोहोचविणारी संस्कृतीच बदलून टाकली. आधीचे सत्ताधारी मात्र ८५ टक्क्यांच्या लुटीकडे दुर्लक्ष करीत राहिले.भारताच्या जगभरातील राजदूत व उच्चायुक्तांना आता पासपोर्ट सेवा प्रकल्पाशी जोडले आहे. त्यासाठी एकच केंद्रीय यंत्रणा निर्माण केली आहे. त्यापुढे जात आता आम्ही ई-पासपोर्ट आणत आहोत,असेही पंतप्रधानांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :नरेंद्र मोदी