Join us

4 दिवस काम करा अन् 5 दिवसांचा पगार घ्या; कंपन्यांचा नवा पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:17 IST

कर्मचाऱ्यांच्या कामाचा दर्जा उंचावत असल्यानं 4 डेड वीकला पसंती

बर्लिन: आठवड्यात फक्त 4 दिवस काम करा. पण पगार 5 दिवसांचा घ्या. ऐकायला थोडं अजब वाटेल. कोणती कंपनी इतकी उदार झाली आहे, असा प्रश्नदेखील तुमच्या मनात येईल. मात्र जगभरातील अनेक कंपन्या सध्या हाच पॅटर्न फॉलो करू लागल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी केल्यावर त्यांच्या कामाचा दर्जा सुधारतो. यामुळे कर्मचारी अधिक जोमानं काम करतात, असं या नव्या पॅटर्नमधून समोर आलं आहे. चार दिवसांचा आठवडा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो, असं निरीक्षण जॅन शुल्ज होफेन यांनी नोंदवलं. होफेन जर्मनीची राजधानी बर्लिनमधल्या प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर कंपनी प्लॅनियोचे संस्थापक आहेत. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीतील 10 कर्मचाऱ्यांसाठी 4 दिवसांचा आठवडा सुरू केला. 'या नव्या व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. त्यामुळे कामाचा दर्जा उंचावतो. कर्मचारी अधिक सजगतेनं काम करतात,' असं होफेन यांनी सांगितलं. न्यूझीलंडमधल्या पर्पेच्युअल गार्डियन या गुंतवणूक आणि इस्टेट व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीनं याचवर्षी 4 दिवसांचा आठवडा सुरू केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा तणाव कमी झाला. कर्मचारी अतिशय समर्पित भावनेनं काम करू लागले. जपान सरकारनंदेखील यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सोमवारी सुट्टी द्यावी, त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांनी कामाचा आनंद घ्यावा, यासाठी जपान सरकार विविध पावलं उचलत आहे. ब्रिटनमधील ट्रेड युनियनदेखील संपूर्ण देशात 4 दिवसांचा आठवडा व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे ऑफिस आणि घर ही कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुसह्य होऊ शकेल, असं मत ट्रेड युनियनच्या आर्थिक बाबींच्या प्रमुख असलेल्या केट बेल यांनी व्यक्त केलं. 

टॅग्स :कर्मचारी