Join us  

पहिल्यांदाच 20 रुपयांचे नाणे येणार; अंधही ओळखू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 1:25 PM

मोदी सरकारने 1 रुपयापासून 20 रुपयांची नाणी आणली आहेत

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मोदी सरकारने बाजारात अगदी 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत नव्या नोटा आणल्या होत्या. आता मोदी सरकारने 1 रुपयापासून 20 रुपयांची नाणी आणली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या नाण्यांचे अनावरण केले. 

सरकारने पहिल्यांदाच 20 रुपयांचे नाणे बाजारात आणण्याची घोषणा केली असून या नाण्याला 12 कडा असणार आहेत. पूर्वी 2 रुपयांचे नाणे या आकारात होते. तसेच याचा व्यास 27 मिमी आणि वजन 8.54 ग्राम असणार आहे. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

नवीन नाण्याच्या बाहेरील बाजुला 65 टक्के तांबे, 15 टक्के झिंक आणि 20 टक्के निकेल असणार आहे. तर आतील बाजुच्या रिंगला 75 टक्के तांबे, 20 टक्के झिंक आणि 5 टक्के निकेल असणार आहे. 

नाण्याच्या पुढील बाजुवर अशोकस्तंभची निशानी असणार आहे, तर त्याखाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले असेल. डावीकडे भारत आणि उजवीकडे 'INDIA' असणार आहे. 

पाठीमागच्या बाजुला नाण्याची किंमत म्हणजेच 20 रुपयांचा आकडा असणार आहे. त्यावर रुपयाचे चिन्ह असणार आहे. शिवाय धान्याचा सिम्बॉलही असेल. या नाण्याशिवाय सरकार 1, 2, 5 आणि 10 रुपयांचे नवीऩ नाणी आणली जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेने 10 रुपयांचे नाणे 2009 मध्ये जारी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंधांनाही ओळखता येणाऱ्या या नव्या नाण्यांचे अनावरण केले आहे. या कार्यक्रमासाठी खास अंध आणि विशेष मुलांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मोदींनी अंध, अपंग मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती या मुलांना दिली. 

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँकरुपी बँकभारतीय चलन