Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात सोन्याच्या मागणीत १९ टक्के वाढ; १२० टन आयात, निर्बंध शिथिल झाल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 07:02 IST

एप्रिल ते जून या तिमाहीत साेन्याची मागणी ७६.१ टन एवढी हाेती.  गेल्या वर्षी याच कालावधीतील मागणीत यंदा १९.२ टक्के वाढ दिसून आली आहे.

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे इतर उद्याेग आणि व्यवसाय ठप्प पडले हाेते. तरीही भारतात साेन्याची मागणी वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत साेन्याची मागणी १९ टक्के वाढली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे साेन्याची आयातही माेठ्या प्रमाणात वाढली आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत साेन्याची मागणी ७६.१ टन एवढी हाेती.  गेल्या वर्षी याच कालावधीतील मागणीत यंदा १९.२ टक्के वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ६३.८ टन एवढी साेन्याची मागणी नाेंदविण्यात आली हाेती. त्यानंतर दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे मागणीत सातत्याने घट हाेत गेली. ही घट ४६ टक्के एवढी नाेंदविण्यात आली, तर गेल्या वर्षी १०.९ टनांच्या तुलनेत १२०.४ टन आयात झाली आहे. 

साेन्यामध्ये हाेणारी गुंतवणूकही १० टक्क्यांनी वाढून ९०६० काेटी रुपये एवढी नाेंदविण्यात आली. साेन्याच्या रिसायकलिंगमध्येही ४३ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी १३.८ टनांच्या तुलनेत १९.७ टन साेने रिसायकल करण्यात आले. लसीकरण आणि सिराे सर्वेक्षणाचे आकडे आशादायी आहेत. आपण काेराेनासाेबत राहण्यास शिकून घेऊ. त्यामुळे व्यापारावर परिणाम हाेणार नाही. यावर्षी दसरा, दिवाळी तसेच लगीनसराईच्या काळात गेल्यावर्षीच्या तुलनेत मागणीत माेठी वाढ हाेण्याची अपेक्षा असल्याचे सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक साेमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले.

का वाढली मागणी?गेल्या वर्षी काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी देशव्यापी लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता. त्यामुळे अक्षय्य तृतीया तसेच लग्न समारंभांच्या निमित्ताने हाेणारी मागणी जवळपास ठप्प झाली हाेती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर मागणीत वाढ झाली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीची स्थिती अनपेक्षित हाेती. यावेळी मात्र व्यापारी सज्ज हाेते. याचा परिणाम मागणीवरही दिसून आला. २०२०च्या पहिल्या सहामाहीत १५७.६ टन एवढी मागणी हाेती. २०१९च्या तुलनेत यात ४६ टक्के  घट हाेती, तर २०१५ ते २०१९ या कालावधीतील सरासरीपेक्षाही ३९ टक्के मागणी कमी हाेती. एप्रिल ते जून या तिमाहीत दागिन्यांची मागणी २५ टक्क्यांनी वाढून ५५.१ टन एवढी नाेंदविण्यात आली. 

टॅग्स :सोनं