लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इस्रायल हमास युद्धाची भीषणता आणखी वाढण्याची भीती असल्याने जगभरातील शेअर बाजारांवर दबाव आला असून, गुरुवारीही शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले.
भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण झाली असून, गुंतवणूकदारांचे तब्बल १७.७७ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेत आहेत. यामुळे मुंबई शेअर बाजार ९०० अंकांनी कोसळून ६३,१४८ अंकांवर बंद झाला.
कच्चे तेल का घसरतेय?
युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात १० टक्क्यांची वाढ दिसून आली होती. मात्र गुरुवारी ते ०.६५ टक्क्यांनी कमी होत ८९.५४ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. युद्ध आणि वाढलेल्या व्याजदरांमुळे बाजारात सुस्ती आहे. मागणी कमी होत जाण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाच्या दरात घसरण पहायला मिळत आहे.
बाजार का घसरतोय?
दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांचे आकडे निराशाजनक विदेशात गुंतवणुकीबाबत असलेली नकारात्मकता इस्रायल हमास युद्धाची भीषणता वाढण्याची भीती व्याज दर वाढल्याने बाजारात आलेली सुस्ती
सोने वधारले, चांदीत घसरण
विजयादशमी व त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात गुरुवारी ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६१ हजार ३०० रुपयांवरून ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.
जगभरात काय?
दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हेंगसेंग, अमेरिका आणि युरोपातील बाजार घसरणीसह बंद झाले.