Join us

फेब्रुवारी महिन्यात झाली १७ लाख वाहनांची विक्री; कोरोनानंतर उलाढाल वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 06:09 IST

गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्क्यांनी वाढ

विशाल शिर्केपिंपरी (पुणे) : उद्योगाला आलेली मरगळ वाहन उद्योगाने झटकून दिल्याचे दिसून आहे. कोरोनानंतर (कोविड१९) प्रथमच फेब्रुवारी २०२१ महिन्यात प्रवासी वाहन, व्हॅन, स्कूटर, दुचाकी विक्रीमध्ये सरासरी दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने मिळून १७ लाख ८ हजार २४५ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली आहे.

मार्च २०२० मध्ये टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर झाल्यानंतर सर्वच उद्योगांचा मागणी आणि पुरवठा विस्कळीत झाला. अजूनही बहुतांश उद्योग मार्च २०२० मधील उत्पादन पातळी गाठण्यासाठी झगडत आहेत. ऑटोमोबाईल उद्योग यातून सावरत असल्याचे वाहन विक्रीची आकडेवारी सांगते. 

फेब्रुवारी २०२१ महिन्याचा इंडस्ट्री कन्झमशन रिपोर्ट जाहीर झाला. त्यात वाहन विक्रीची आकडेवारी देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहन विक्रीचा आकडा २.८१ लाखांवर गेला. फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत त्यात १७.९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. युटिलिटी श्रेणीतील वाहन विक्रीत सर्वाधिक ४५.३ टक्क्यांनी वाढ झाली. प्रवासी कार आणि व्हॅनच्या विक्रीत अनुक्रमे ४.४ आणि ४.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, देशभरात १४.३ लाख दुचाकी फेब्रुवारीत विकल्या गेल्या. 

गेल्या फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात १०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोपेड श्रेणीतील वाहनांची विक्री ५५ हजार ८०२ वरून ५१ हजार ४४५ वर घसरली. दुचाकी वाहनांच्या एकूण विक्रीत गेल्या सात महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. स्कूटरमध्ये १०.१ आणि मोटारसायकलच्या विक्रीत ११.५ टक्के वाढ झाली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी वाहन विक्री घटली होती. ही तूट भरून काढण्यासाठी वाहन कंपन्यांकडून विविध सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच मार्चअखेर असल्याने वाहनांची विक्री वाढत असते. त्याचबरोबर खरेदीदारांची मानसिकताही सकारात्मक आहे. अशा दुहेरी कारणांमुळे वाहन विक्रीत वाढ नोंदविण्यात आली आहे.-मनोज सेठी, माजी अध्यक्ष, पुणे ऑटोमोबाईल असोसिएशन

टॅग्स :कारबाईककोरोना वायरस बातम्या