Join us  

अडचणीत असलेल्या बँकांच्या ठेवीदारांना १३०० कोटी परत, आधी ठेवीदारांच्या नशिबी हाेता संघर्ष : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 8:48 AM

अडचणीत सापडलेल्या बँकेत जमा असलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांना प्रचंड संघर्ष करावा लागताे. मात्र, आता हे चित्र बदलले आहे, पंतप्रधानांचं वक्तव्य

नवी दिल्ली : अडचणीत सापडलेल्या बँकेत जमा असलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांना प्रचंड संघर्ष करावा लागताे. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. गेल्या वर्षभरात एक लाखाहून अधिक ठेवीदारांना अडकलेले १३०० काेटी रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिली. विज्ञान भवनात जमा ठेव विमासंबंधित आयाेजित कार्यक्रमात पंतप्रधान माेदी बाेलत हाेते. गेल्या वर्षी जमा ठेव विमा आणि कर्ज हमी सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केले हाेते. काेणत्याही बँकेवर आरबीआयने प्रतिबंध लावल्यास ९० दिवसांच्या आत ठेवीदारांना त्यांच्या ठेवीपैकी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते. यासंबंधी माहिती देताना पंतप्रधान माेदी म्हणाले, की अनेक दशकांपासून ही समस्या भेडसावत हाेती. ती ज्या पद्धतीने साेडविण्यात आली, त्याचा आजचा दिवस साक्षीदार आहे. वर्षभरात एक लाखाहून अधिक ठेवीदारांना १३०० काेटी रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाली आहे. यामुळे खातेधारकांचा बँकिंगवरील विश्वास वाढल्याचे माेदी म्हणाले. बँकांची क्षमता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी छाेट्या बँकांचे सार्वजनिक क्षेत्रातील माेठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात येत असल्याचे माेदी म्हणाले. केवळ बँक खात्यांचीच समस्या नव्हती, तर दुर्गम भागातही बँकिंग सुविधा पाेहाेचविण्यातही अडचण हाेती. मात्र, ग्रामीण भागात पाच किलाेमीटरच्या परिक्षेत्रात बँक शाखा किंवा बँकिंग प्रतिनिधी उपलब्ध असल्याचे माेदी म्हणाले. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा महिलांना लाभ हाेत असल्याचेही माेदींनी सांगितले.

९८ टक्के ठेवीदारांना योजनेचा फायदासरकारने ठेवीदारांना मिळणारी विम्याची रक्कम एक लाखावरून पाच लाख रुपये केली आहे. या कक्षेत देशातील विविध बॅंकाचे ९८ टक्के ठेवीदार येतात. बँकांना वाचवायचे असेल तर या ठेवीदारांना संरक्षण देणे आवश्यक आहे. यापूर्वी पैसे मिळण्यासाठी काेणतीही कालमर्यादा नव्हती. आता ९० दिवसांच्या आत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते असल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले.

बँकांना सक्षम केले : अर्थमंत्रीबँक ठेवीदारांना सुरक्षितता देणे ही मोदी सरकारने प्राधान्याने केलेली कृती आहे. त्याचप्रमाणे बँकांना सक्षम करण्यासाठीही आम्ही काम करीत आहोत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. मध्यमवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने ठेवींच्या विम्याची रक्कम वाढविली आहे. तसेच गृहकर्जाच्या व्याजाचे दर कमी करण्यात आल्याने मध्यमवर्ग आपले घराचे स्वप्न साकारू शकत असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिक व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतविणाऱ्यांना जास्त जोखीम स्वीकारावी लागत असते. त्याचप्रमाणे पैसे बुडण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे सावधपणे गुंतवणूक करावी, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी बोलताना केले.

टॅग्स :नरेंद्र मोदीनिर्मला सीतारामन