Join us

SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:43 IST

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, योग्य पर्याय निवडणं महत्वाचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, योग्य पर्याय निवडणं महत्वाचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. खरं तर, दीर्घकालीन पैसे कमवण्यासाठी, भारतीय गुंतवणूकदार अनेकदा दोन प्रसिद्ध पर्यायांमध्ये गोंधळलेले असतात - सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि एसआयपी (SIP). खरं तर, हे दोन्ही पैसे वाढवण्याची विश्वसनीय माध्यमं आहेत, परंतु दोघांचा मार्ग वेगळा आहे. तर आपण समजून घेऊया की १५ वर्षांसाठी दरवर्षी ₹९५,००० गुंतवून कोण जास्त नफा देऊ शकतो.

PPF: सुरक्षित आणि टॅक्स-फ्री पर्याय

पीपीएफ ही भारत सरकारच्या पाठिंब्यानं सुरू असलेली सर्वात विश्वासार्ह बचत योजनांपैकी एक आहे. सध्या, ही योजना दरवर्षी सुमारे ७.१% व्याजदर देते, ज्यामध्ये चक्रवाढीचा फायदा मिळतो. त्याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षे आहे, म्हणून शिस्तबद्ध आणि जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा अधिक चांगला मानला जातो.

Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पीपीएफ पूर्णपणे करमुक्त आहे (ईईई श्रेणी) म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर नाही. जर एखाद्या व्यक्तीनं दरवर्षी ₹९५,००० जमा केले तर १५ वर्षांत त्याचा निधी सुमारे ₹२७.७ लाख होईल. बाजाराशी संबंधित गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मर्यादित आहे.

SIP: इक्विटी म्युच्युअल फंडांसह वाढीची संधी

जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये वार्षिक ₹९५,००० (अंदाजे ₹७,९०० मासिक) गुंतवले तर तुम्हाला दीर्घकाळात खूप जास्त परतावा मिळू शकतो. इक्विटी मार्केटनं नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. एसआयपी चक्रवाढ आणि रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचे फायदे देते.

जर यामध्ये तुम्हाला १५ वर्षांत १० टक्क्यांचा नफा मिळाला तर तुमची रक्कम ३८ लाख रुपये होऊ शकते. जर तुम्हाला १२ टक्के परतावा मिळाला तर तुमची रक्कम ४३.५ लाख रुपये, १४ टक्के परतावा मिळाल्यास ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमू शकते.

१०% (वार्षिक १ लाख रुपयांपेक्षा जास्त नफा) लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर वजा केल्यानंतरही, SIP मधून मिळणारा निधी PPF पेक्षा १.५ ते २ पट जास्त असू शकतो. तसंच, SIP मध्ये कोणताही निश्चित लॉक-इन नाही. परंतु यामध्ये जोखीम खूप जास्त आहे.

पीपीएफ-एसआयपी कोणता पर्याय निवडावा?

जर तुम्हाला सुरक्षित, हमी परतावा आणि कर सवलत हवी असेल, तर पीपीएफ तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यासोबतच, जर तुम्ही बाजारातील चढउतार सहन करू शकत असाल आणि अधिक संपत्ती निर्माण करू इच्छित असाल, तर एसआयपी योग्य आहे. जर तुमच्याकडे चांगले पैसे असतील, तर पीपीएफ आणि एसआयपी दोन्हीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात भरपूर पैसे कमवू शकता. म्हणजेच, दरवर्षी ₹९५,००० गुंतवल्यानंतर पीपीएफ तुम्हाला सुमारे ₹२७.७ लाख देईल, तर एसआयपी बाजाराच्या कामगिरीनुसार सुमारे ₹३८ ते ५० लाख कमवून देऊ शकते. म्हणून, दोन्हीमध्ये गुंतवणूक करणं आणि सुरक्षितता तसंच वाढ दोन्ही सुनिश्चित करणं महत्त्वाचं आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा