Join us

सर्वात लवचिक आहे 'हा' फंड, फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडचा फायदा कोणता? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:46 IST

Mutual Fund Investment : इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप, लार्ज-मिड कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे चार महत्त्वाचे फंड आहेत. म्हणजे गुंतवणूकदाराने जर यापैकी एक म्युच्युअल फंड निवडला तर त्याच फंडात रक्कम गुंतवली जाते.

इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप, लार्ज-मिड कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे चार महत्त्वाचे फंड आहेत. म्हणजे गुंतवणूकदाराने जर यापैकी एक म्युच्युअल फंड निवडला तर त्याच फंडात रक्कम गुंतवली जाते. उदा. लार्ज कॅप फंड निवडला तर एकरकमी किंवा एसआयपी असल्यास त्यानुसार प्रत्येक महिन्यात ठराविक रक्कम त्याच म्युच्युअल फंडात जमा होत राहते. म्हणजे यात लवचिकता नसते.

मग असा कोणता म्युच्युअल फंड आहे की ज्यात लवचिकता आहे? म्हणजे एका फंडमधून दुसऱ्या कॅपमधील फंडमध्ये हस्तांतरित करता येते? उदा. स्मॉल कॅपमधील लार्ज कॅपमध्ये किंवा लार्ज कॅपमधून मीड कॅपमध्ये असे. अशी लवचिकता फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड मध्ये असते. यात फंड मॅनेजर एका कॅपमधून दुसऱ्या कॅपमधील फंडात रक्कम हस्तांतरित करू शकतो. सेबी म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने गुंतवणूकदारांच्या हितासाठी नोव्हेंबर २०२० या महिन्यात अशा प्रकारचा नवीन म्युच्युअल फंड प्रकार सुरू केला.

फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडचा फायदा कोणता? 

इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवलेली रक्कम शेअर बाजारात त्या त्या कॅपमधील लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतविली जाते. शेअर बाजार अनेक कारणांनी वर-खाली होत असतो. यातील चढउतार गुंतवणूकदारांना कधी धास्तीत लोटतो, तर कधी आनंदी करीत असतो. 

बाजारात सेक्टरनिहाय चढउतारही दिसून येतात. कधी कधी लार्ज कॅपमधील कंपन्यांमध्ये मंदीचे वातावरण, तर कधी स्मॉल कॅपमधील कंपन्यांना देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावरील मंदीचा फटका बसत असतो, साधारण हा तेजी मंदीचा फेरा काही कालावधीसाठी किंवा दोन ते तीन वर्षांसाठी राहतो. अशा नकारात्मक परिस्थितीत फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड मॅनेजर ज्या त्या वेळेस योग्य निर्णय घेऊन फंडमधील रक्कम एका कॅपमधून दुसऱ्या कॅपमध्ये हस्तांतरित करीत असतो. म्हणजेच जिथून वर्तमानात आणि भविष्यात फायदा अधिक अशा ठिकाणी. याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना मिळतो आणि त्यांचे गुंतवणूक रिटर्न वाढीला मदत होते.

कोणत्याही कामात जर यश अपेक्षित असेल तर त्यासाठी कार्यात लवचिकता असणे आवश्यक असते. याच तत्त्वानुसार म्युच्युअल फंडमधील लवचिकता असणारा फ्लेक्सी कॅप म्युच्युअलफंडही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतो. योग्य वेळी योग्य तो बदल गुंतवणूकदारांच्या हिताचा ठरू शकतो. अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंडमधून योग्य फंड निवडणे यासाठी गुंतवणूकदारांनी अधिकृत गुंतवणूकदार सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे अधिक उचित ठरते.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार